काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार; Congress मध्ये नेतृत्व बदलावर संभ्रम

220
Delhi Assembly Election : काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच स्वीकारला पराभव; 'हे' नेते प्रचारातून गायब
  • मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांनी नकार दिल्याने पक्षाच्या नेतृत्व बदलावर संभ्रम निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने प्रदेशाध्यक्षपदासाठी काही तरुण नेत्यांची विचारणा केली होती, मात्र त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. (Congress)
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामगिरीबाबत पक्षाच्या अंतर्गत बैठकीत नाराजी व्यक्त झाल्यानंतर नवीन नेतृत्वाचा पर्याय शोधला जात आहे. पक्षाला तरुण आणि उर्जावान नेतृत्वाची गरज असल्याचे मत अनेक वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर, सतेज पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम या नेत्यांचे नाव चर्चेत आले. मात्र, या नेत्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते राहून काम करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.  (Congress)
नकार देण्यामागे काय आहेत कारणे
तरुण नेत्यांनी नकार देण्यामागे पक्षातील गटबाजी, अंतर्गत मतभेद, आणि प्रदेशाध्यक्षपदासोबत येणाऱ्या आव्हानांची भीती असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीत, पक्षाला पुनरुज्जीवित करणे ही मोठी जबाबदारी असून, निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांवर टाकली जाते, हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे.  (Congress)
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसला महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका, पंचायत समितीच्या त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रभावी नेतृत्व उभे करावे लागणार आहे. (Congress)
या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वाबाबतची अनिश्चितता अधिक गडद झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Congress)
विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर
वडेट्टीवार हे अनुभवी नेते असून, पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.सूत्रांच्या मते, वडेट्टीवार यांचा विदर्भातील मजबूत प्रभाव आणि त्यांच्या कामाचा अनुभव पाहता, त्यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पक्षाच्या गटबाजीला सामोरे जात, आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे संघटन बळकट करण्याचे आव्हान वडेट्टीवार यांच्या समोर असेल. विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने वडेट्टीवार यांच्यासारखा आक्रमक नेता अध्यक्ष म्हणून हवा असा पक्षातल्या काही प्रादेशिक नेत्यांचा आग्रह आहे. नाना पटोले यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केले आहे की प्रदेशाध्यक्ष पदावर कुणाचीही निवड झाली तर त्यांची हरकत नसेल. मात्र, वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तर पटोले समर्थकांना ते पचनी पडणार नाही अशी देखील चर्चा आहे. (Congress)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.