युवा सेनेचे ‘ते’ आंदोलन शिवसैनिकांच्या जिव्हारी!

युवा सेनेच्या या आंदोलनानंतर प्रत्येक शाखांमध्ये या आंदोलनाची चर्चा रंगू लागली आणि युवा सेनेच्या एककल्ली कार्यक्रमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होवू लागली.

76

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी जुहू येथील अदिश बंगल्याच्या परिसरात युवा सेनेने केलेल्या आंदोलनामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शिवसैनिकांना कुठेही विश्वासात न घेता युवा सेनेने परस्पर हे आंदोलन केल्यामुळे एक प्रकारे आपल्यावर अविश्वासच टाकला गेल्याची भावना निष्ठावान शिवसैनिकांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे आधीच ‘नाकापेक्षा मोती जड’ झालेल्या युवा सेनेच्या विरोधातील संतापाची लाट आता शाखा-शाखांमधून सुप्तपणे उसळू लागली आहे. आपल्याला डावलून युवा सेनेने केलेले ‘ते’ आंदोलन शिवसैनिकांच्या चांगले जिव्हारी लागले असून त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद आता शाखाशाखांमधून दबक्या आवाजात असलेल्या चर्चेतून उमटू लागले आहेत.

विभागप्रमुख, शाखा प्रमुखांना डावलले!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्या जुहू बंगल्याच्या परिसरात मोर्चा काढून त्यांचा निषेध करण्यात आला आहे. युवा सेनेने केलेल्या आंदोलनाची वृत्ते प्रसारमाध्यमातून पसरु लागल्यानंतर दुपारनंतर शिवसेनेने विभागप्रमुख बाहेर पडले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चौकाचौकांमध्ये निषेध आंदोलन करण्यात आली. युवा सेनेने कोणत्याही विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख यांना कल्पना न देता परस्पर कोअर कमिटीसह पदाधिकाऱ्यांना कल्पना देत हे आंदोलन केले.

(हेही वाचा : राड्यानंतर राजकारण जोरात, पण शिवसेनेचे ‘ते’ नेते कुठे दिसेनात)

शाखा प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी 

विशेष म्हणजे ज्या जुहूमध्ये हे आंदोलन केले तेथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखालाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे युवा सेनेच्या या आंदोलनानंतर प्रत्येक शाखांमध्ये या आंदोलनाची चर्चा रंगू लागली आणि युवा सेनेच्या एककल्ली कार्यक्रमाबाबत तीव्र नाराजी आपापसात व्यक्त होवू लागली होती. काही शाखाप्रमुखांनी ती शिवसैनिकांसमोरच नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे आंदोलन करून युवा सेनेने शिवसैनिकांवर अविश्वास दाखवला असल्याची भावनाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होती. तर शिवसैनिकांच्या मते राणे यांना कोणतीही किंमत देण्याची गरज नव्हती. त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. आपण त्यांना किंमत दिली तर त्यांना अधिक किंमत प्राप्त होईल. जे शिवसेनेला कधीही होवू द्यायचे नाही. परंतु युवा सेनेने हे आंदोलन करून राणे यांना मोठे केल्याचेही शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.