महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना फ्रंट लाईनवर: वरुणाच्या नेतृत्वाखाली युवा सज्ज

आगामी निवडणुकीत शिवसेनेची दुसरी फळी असलेली युवा सेना आता फ्रंट लाईनवर आल्याने शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

83

मुंबई महापालिका निवडणुका पर्यावरण मंत्री व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृवाखाली युवा सेनेच्या जोरावर लढवल्या जातील, असे बोलले जात आहे. असे असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद रस्त्यावर उतरवून दाखवून दिली आहे. आजवर शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर रस्त्यांवर उतरणाऱ्या युवा सेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात वन मॅन शो आंदोलन करुन दाखवले. या आंदोलनातून युवा सेनेने आपल्याला जुन्या शिवसैनिकांची गरज नसून आम्हीच आता काफी आहोत, हे दाखवून देतानाच, आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचेही संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे पहिलेच आंदोलन आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेची दुसरी फळी असलेली युवा सेना आता फ्रंट लाईनवर आल्याने शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

युवा सेनेचे लक्ष्यवेधी आंदोलन

मुंबई महापालिकेची निवडणूक ही पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली न लढता, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज असलेल्या आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या बळावर ही निवडणूक लढवण्याचा पण केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी, जुहूमध्ये युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने केलेले आंदोलन लक्ष्यवेधी ठरले आहे.

(हेही वाचाः वरुण सरदेसाईंना सरकारी भाचा घोषित केले आहे का? मनसेचा सरकारला सवाल)

युवा सेना झाली चार्ज

आजवर युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जुन्या शिवसैनिकांच्या पाठीमागे राहून आंदोलनात सहभागी झालेले सर्वांनी पाहिले होते. परंतु मंगळवारी झालेले हे आंदोलन जुन्या शिवसैनिकांना बाजूला ठेऊन तथा अंधारात ठेऊन केले गेले. हे आंदोलन करुन युवा सेनेने आपल्या पहिल्या यशस्वी आंदोलनाची नोंद केली आहे. युवा सेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाले असले तरी या आंदोलनाच्या माध्यमातून फ्रंटलाईनवर येत आंदोलनात सहभागी होत एकप्रकारे युवा सेना पूर्ण चार्ज झाली आहे. त्यामुळे युवा सेनेची ताकद आता प्रत्येक विभागा-विभागांमध्ये निर्माण करुन शिवसैनिकांची दुसरी फळी निर्माण केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप

युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाईंनी आपल्या नेतृत्त्वाखाली केलेले हे पहिले आंदोलन यशस्वी झाले आहे. वरुण सरदेसाई यांनी यापूर्वी विद्यापीठ निवडणुकीत युवा सेनेचे नेतृत्व केले होते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याचे काम सरदेसाई करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेची ताकद आजमवण्यासाठी केलेल्या या पहिल्या आंदोलनाच्या यशस्वी प्रयोगानंतर शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे व युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यासह युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

(हेही वाचाः शिवसेनेच्या आंदोलनामुळे राज्याला झाले ‘हे’ फायदे… मनसेने दिली यादी)

युवा सैनिकांनी मिळणार निवडणुकांसाठी जागा?

आगामी महापालिका निवडणुकीत जुन्या चेहऱ्यांना घरी बसवून तरुणांना संधी देण्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एकूण जागांच्या ३५ ते ४० टक्के जागा या युवा सेना पदाधिकाऱ्यांना देण्याचा विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे युवा सेनेने दाखवलेल्या या हिंमतीमुळे आता त्यांच्या नावाचा विचार अधिक प्रखरतेने होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.