युवा सैनिक ठरत आहेत शिवसेनेच्या शाखांचा आधार

शाखांमधून युवा सैनिकांची दुसरी फळी निर्माण होत असल्याने शिवसैनिकांची पहिली फळी कमजोर होताना दिसत आहे.

एकेकाळी शिवसेनेच्या शाखांमध्ये शिवसैनिकांचा दरारा असायचा. पण आता शाखांमधील शिवसैनिकांची गर्दी कमी होऊ लागली आहे. रस्त्या-रस्त्याला आणि चौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यासाठी झटणारा शिवसैनिक, आता शाखांपासून दूर जात असून, त्यांची जागा आता युवा सैनिकांनी घेतली आहे. आज शाखांच्या प्रत्येक कामांमध्ये युवा सैनिक जातीने पुढे दिसत आहेत. युवा सेनेच्या वाढत्या प्रस्थापुढे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही आता शाखांमध्ये विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग संघटक, तसेच शाखाप्रमुख यांच्या बरोबरीने मानाचे पान दिले जात आहे. त्यामुळे शाखांमध्ये आज युवा सैनिक प्रमुख आधारस्तंभ म्हणून काम करताना दिसत आहेत.

नेत्यांच्या मुलांची दुसरी फळी

शिवसेनेमध्ये भारतीय विद्यार्थी सेना ही संलग्न असली, तरी आदित्य ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात भाग घेतल्यानंतर विद्यार्थी सेना विसर्जित करुन त्याऐवजी युवा सेनेची स्थापना करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या प्रमुख पदाची धुरा वाहताना प्रत्येक शाखांमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी नियुक्त केले आणि शिवसेनेची एक तळाची फळी निर्माण केली. युवा सेनेची स्थापना करताना नेत्यांच्या मुलांचे पुनर्वसन युवा सेनेच्या पदाधिकारीपदी करण्यात आले. त्यामुळे नेत्यांचे पुनर्वसन करताना दुसरी नेतृत्वाची एक फळी निर्माण करण्याचा जो उद्देश होता, तो आता प्रत्यक्षात सकारताना दिसत आहे.

(हेही वाचाः आता शिवसेनेचे शेवाळेही ‘ख्वाजा’च्या हवाली!)

अशी करतात कामे

आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणात असताना, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फारसे महत्व दिले जात नसले, तरी प्रत्यक्षात आदित्य ठाकरे हे मंत्री बनल्यानंतर, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान शाखांमधून वाढू लागला आहे. शाखांमध्ये जी कामे वरिष्ठ शिवसैनिक करत असत, तीच कामे आता युवा सेनेचे पदाधिकारी करत आहेत. इतकंच नाही तर शाखा प्रमुखांपेक्षाही अधिक संघटनात्मक कामाचा भार, युवा सेनेचे पदाधिकारी व सैनिक वाहताना दिसत आहेत. पूर्वी शाखांमध्ये नगरसेवक आणि शाखाप्रमुख हेच पत्रव्यवहार करत असत. परंतु ही धुरा आता युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, कुठेही पत्रव्यवहार करायचा झाल्यास युवा सेनेचे पदाधिकारी हिरीरीने काम करताना दिसत आहेत.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीत ‘युवागिरी’)

पहिली फळी कमजोर

महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत अमेय घोले, समाधान सरवणकर, हर्षद कारकार, सुप्रभा फातर्पेकर, रामदास कांबळे आदी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यातून प्रेरणा मिळाल्याने युवा सेनेचे पदाधिकारी आपली गुणवत्ता, शाखांमधून काम करत सिध्द करताना दिसत आहेत, जेणेकरुन निवडणुकीत आपला क्रमांक लागेल. विशेष म्हणजे युवा सैनिक हे ऑनलाईन प्रवेश असो वा नोंदणी असो किंवा अन्य प्रकारचे उपक्रम शाखांमधून राबवायचे असल्यास त्यासाठी पुढे असतात. त्यामुळे शाखांमधील वरिष्ठ सैनिकांचा भार बराच कमी हेातो.

(हेही वाचाः शिव कि युवा? सैनिकांमध्ये गोंधळ)

शिवसेनेच्या प्रत्येक शाखांमध्ये युवा सेनेचा शाखाध्यक्ष, युवती अधिकारी हे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत असून, त्यांच्याकडून संघटनात्मक कामे होत असल्याने वरिष्ठ पदाधिकारही त्यांना सोबत घेऊनच काम करताना दिसत आहेत. त्यामुळे शाखांमधून युवा सैनिकांची दुसरी फळी निर्माण होत असल्याने शिवसैनिकांची पहिली फळी कमजोर होताना दिसत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here