Yuvasena : युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांची तब्बल साडे आठ तास चौकशीअंती सुटका

206
कोविड १९ टेंडर घोटाळा प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांची तब्बल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून त्यांना सोडण्यात आले. सूरज चव्हाण हे दुपारी १ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीकामी दाखल झाले होते.
ईडीकडून मुंबई महानगर पालिकेच्या कोव्हिड टेंडर घोटाळा प्रकरणी मनी लॉडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्याकडून गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यापैकी युवा सेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या घरी देखील ईडीने छापेमारी करून काही महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली होती. दरम्यान ईडीच्या हाती एक डायरी मिळून आली असून या डायरीत कोणाला किती पैसे देण्यात आले याची इत्यंभूत माहिती असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले होते.
दरम्यान ईडीच्या तपासात कोव्हिड टेंडर घोटाळा प्रकरणात मनपा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या चार नावे समोर अली असून त्यापैकी चव्हाण यांचे एक नाव आहे. शुक्रवारी ईडीने चव्हाण यांना चौकशीकामी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. सूरज चव्हाण हे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले, दरम्यान ईडी कडून त्यांची तब्बल साडे तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवुन सोडण्यात आले आहे.
ईडीच्या तपासात चार मध्यस्थांपैकी चव्हाण एक असल्याचा संशय आहे. त्याचे नाव चार ते पाच करारांमध्ये आले असून चव्हाण यांच्याशी संबंधित रोखीच्या व्यवहारांची छाननी सुरू आहे. ईडीकडून चव्हाण यांच्या पुरवठादार आणि कंत्राटदारांसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅट्स वर झालेल्या संभाषणाचा शोध घेत आहे, असे तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
ईडीकडून चव्हाण यांच्या मुंबई उपनगरातील सुमारे १० कोटी रुपयांच्या चार फ्लॅटचीही ओळख पटवली आहे. या फ्लॅट्स कोरोनाच्या काळात खरेदी केल्याचा आरोप आहे आणि खरेदीत वापरल्या गेलेल्या पैशांचे स्रोत तपासले जात आहेत. चव्हाण यांना सापडलेल्या डायरीतील मजकूर घेऊन पुरवठादारांसोबतच्या रोख व्यवहारांचे तपशील ईडी कडून तपासले गेले या संदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी ऑगस्ट २०२२ मध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी सध्या कोविड-१९ जंबो सेंटर्स आणि टेंडर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. नंतर ईडीने या प्रकरणी मनी लोंदरिंग गुन्हा नोंदवला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.