‘अच्छे दिन’चा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दिपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या खाईत लोटून अधिक संकटात टाकले आहे. संपूर्ण राज्यांमधील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याकरिता याचा तीव्र निषेध म्हणून युवासेना आंदोलन करणार आहे.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेतर्फे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातील प्रत्येक शहर व तालुक्यामध्ये इंधन दरवाढ विरोधात ‘सायकल रॅली’चे आयोजन केले आहे. रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी स. १०.३० ते दु. १२.३० या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणार आहे.
(हेही वाचा : परमबीर सिंगांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट!)
मुंबईसह राज्यातील प्रत्येक शहर व तालुक्यात ‘सायकल रॅली’
केंद्र सरकारच्या वाढत्या इंधनवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन संघर्षमय बनले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा आलेख वाढत आहे. एकीकडे बेकारी सुरु आहे आणि दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे जनसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या वाढत्या महागाईच्याविरोधात आता युवासेना रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी मुंबईसह राज्यातील प्रत्येक शहर व तालुक्यात ‘सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवासेनेकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community