गरीबांना मोफत लस देण्यासाठी मंगेशकर रुग्णालयाचे मोठे पाऊल! लता मंगेशकर यांनी दिली माहिती

जास्तीत-जास्त गरीब, गरजूंचे मोफत लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या काही खाजगी लसीकरण केंद्रांवर नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी होणारा खर्च हा गरीब, गरजू लोकांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे मोफत लसीकरणासाठी सरकारी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पण आता याच बाबतीत पुण्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गरीब, गरजूंच्या हितासाठी पुढे आले आहे. मोफत लसीकरणासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक फंड सुरू करण्यात येणार असून, त्यातील निधीतून गरीबांना मोफत लस देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती लता मंगेशकर यांनी ट्वीट करत दिली आहे.

रुग्णालय प्रशासनाची माहिती

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे हितचिंतक, देणगीदार, डॉक्टर्स व कर्मचारी तसेच रोटरी क्लब व इतर कंपन्यांच्या सी.एस.आर निधीतून रुग्णालयाला मिळणा-या निधीचा वापर, मंगेशकर रुग्णालयातर्फे गरीब, गरजू लोकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयाकडून श्रीमंगेश वॅक्सिन फंडची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे ज्या गरजूंना लसीकरणासाठीचा खर्च परवडणार नाही, अशा कुटुंबांसाठी दररोज 100 ते 200 लसीकरण हे मोफत केले जाणार आहे. तसेच यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल, असे देखील सांगण्यात आले आहे.

या मोफत लसीकरणासाठी पात्रता ठरवणे हा सर्वस्वी रुग्णालयाचा अधिकार असणार आहे. त्याबाबतचे निकष लाभार्थ्यांकरता बंधनकारक असणार आहेत. या निधीतून जास्तीत-जास्त गरीब, गरजूंचे मोफत लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः घरोघरी लसीकरण करण्याची महापालिकेने तयारी करावी! उच्च न्यायालयाचे निर्देश )

कोण असू शकतात लाभार्थी?

  • घरकाम कामगार कर्मचारी
  • फेरीवाले
  • रस्त्याच्या कडेला असणारे भाजी, फळे व किरकोळ विक्रेते
  • रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी
  • हातगाडीवाले
  • रिक्षावाले

यांसारख्या इतर गरजू व्यक्ती या मोफत लसीकरणासाठी पात्र असू शकतात, असे सांगण्यात आले आहे. याबाबतच्या पात्रता रुग्णालय प्रतिनिधीकडून ठरवल्या जाणार आहेत.

समाजहितासाठी उपक्रम

हा उपक्रम समाजहित व लोकसेवा या उद्देशाने राबवण्यात येत असून, खर्च वगळता मिळणारे सर्व पैसे हे लसीकरणासाठीच वापरण्यात येणार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय या उपक्रमातून एकही रुपयाचे उत्पन्न कमवणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here