खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित! जाणून घ्या किती… 

निर्धारित दरांपेक्षा जास्त रक्कम लसींसाठी खासगी रुग्णालयांनी आकारल्यास कारवाई होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

220

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशभरात १८ वयोगटापुढील घटकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे ७५ टक्के लसी केंद्र सरकार घेणार आहे. मात्र २५ टक्के लसी खासगी रुग्णालये घेऊ शकतात, असेही केंद्राने म्हटले आहे. मात्र म्हणून खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा दार आकारू शकत नाहीत. मुंबई महापालिकेने सर्व लसींचे दर निश्चित केले आहेत. निर्धारित दरांपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास कारवाई होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

असे आहेत लसींचे दर!

  • कोविशिल्ड – ७८० रुपये
  • कोवॅक्सिन – १ हजार ४१० रुपये
  • स्पुटनिक व्ही – १ हजार १४५ रुपये
  • ५ टक्के वस्तू व सेवा कर आणि १५० रुपये सेवा शुल्काचाही समावेश

(हेही वाचा : यापुढे महामुंबईत इमारत कोसळली तर गंभीर परिणाम होतील! उच्च न्यायालयाचा इशारा )

इथे करता येईल तक्रार! 

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निर्धारित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी दर आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने complaint.epimumbai@gmail.com हा इ-मेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे.

केंद्राच्या निकषानुसार दर निश्चित!  

राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम हा १६ जानेवारी २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येत आहे. मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासकीय तसेच महानगरपालिका केंद्रात विनामूल्य लसीकरण केले जात आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मुक्त धोरणानुसार खासगी लसीकरण केंद्र लस उत्पादकाकडून लस खरेदी करून नागरिकांचे सशुल्क लसीकरण करू शकतात. यासंदर्भात ८ जून २०२१ रोजी केंद्र सरकारने खासगी लसीकरण केंद्राने लाभार्थ्याकडून आकारण्याचे दर निश्चित केले आहेत. या अनुषंगाने लस उत्पादकाने दिलेला दर तसेच अधिक ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि जास्तीत जास्त १५० रुपये सेवाशुल्क खासगी लसीकरण केंद्र लाभार्थ्याकडून घेऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.