मुंबईत मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने जोर धरला असून, एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येने ११ हजारावर उडी मारली होती. त्यानंतर ही रुग्णसंख्या दररोज १५ ते २० हजाराच्या घरात जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या रुग्णसंख्येला ९ ते १० हजारांच्या आतच थोपवून धरण्यात महापालिकेला यश आले. तरीही संपूर्ण मार्च महिन्याच्या दुप्पट आणि तिप्पट रुग्ण आणि मृतांची संख्या आता १८ एप्रिल २०२१ पर्यंत आढळून आली आहे. सर्वात भयानक म्हणजे केवळ या १८ दिवसांमध्येच ६४३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे.
असा वाढतोय रुग्णांचा आकडा
मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत ११ मार्च २०२०मध्ये पहिला रुग्ण आढळून आला आणि त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये ४ हजार ४४७ रुग्ण आढळून आले होते, तर २५६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण एक वर्षाने जेव्हा मार्चपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली, तेव्हा संपूर्ण मार्च महिन्यात ८७ हजार ९३८ रुग्ण आढळून आले, तर २१२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत चालू एप्रिल महिन्यात १८ तारखेपर्यंत सर्वाधिक १ लाख ५५ हजार ९५१ बाधित रुग्ण आढळून आले. आजवरचा सर्वाधिक रुग्णांचा आकडा ५७ हजार व ५२ हजार एवढा होता. जो अनुक्रमे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये नोंदवला गेला होता. पण त्यानंतर रुग्ण संख्या कमी आढळून आली. पण मार्चमध्ये अचानक उसळी घेतलेल्या या रुग्ण्संख्येने आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा दुप्पटीने मजल मारली आहे.
(हेही वाचाः कोरोना वाढतोय, महापालिकेचे चुकतंय कुठे?)
मृत्यूही तिप्पटीने वाढले
एप्रिलच्या केवळ १८ दिवसांमध्येच ६४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जो मार्च महिन्यातील मृत्यूच्या तुलनेत चक्क तिप्पट आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसांमधील संख्या जरी गृहीत धरली, तरी मागील वर्षी ज्याप्रमाणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णांचे मृत्यू झाले होते, तेवढा आकडा आता सहज पार होतोय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. मागील सलग तीन दिवस ५०हून अधिक रुग्णांच्या मृत्यूचा आकडा येत आहे.
१८ दिवसांमध्येच सर्वाधिक चाचण्या
मुंबईत आजवर कोरोनाबाधित रुग्णांच्या करण्यात येणाऱ्या चाचण्या या जास्तीत-जास्त मासिक साडेतीन ते पाच लाखांपर्यंत पोहोचल्या होत्या. पण मार्च २०२१ या एकाच महिन्यात तब्बल आठ लाख चाचण्या करण्यात आल्या. या एकाच महिन्यात ७ लाख ९१ हजार ४५२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. पण त्याही तुलनेत या १८ दिवसांमध्ये विलक्षण वाढ होऊन सर्वाधिक चाचण्यांची नोंद झाली आहे. या १८ दिवसांमध्येच ८ लाख १६ हजार १४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय बंद, कोविड केंद्रावरच मुलुंडकरांची मदार!)
अशी आहे मार्च व एप्रिलची तुलना
मार्च महिन्यातील एकूण रुग्ण: ८७ हजार९४४
१८ एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण: १ लाख ५५ हजार ९५१
मार्च महिन्यातील एकूण मृत्यू: २१२
१८ एप्रिलपर्यंत एकूण मृत्यू: ६४३
मार्च महिन्यातील एकूण चाचण्या: ७ लाख ९१ हजार ४५२
१८ एप्रिलपर्यंतच्या एकूण चाचण्या: ८ लाख १६ हजार१४
Join Our WhatsApp Community