राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना पहिले प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून 1 लाख रूपये, द्वितीय 75 हजार तर तिसरे पारितोषिक 50 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
जिल्ह्यातही आशा सेविकाना मिळणार पारितोषिक
त्याचप्रमाणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकाना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ करण्यात आली असून पहिल्या क्रमांकास 50 हजार रूपये दुसऱ्या क्रमांकाच्या आशा वर्करला 30 हजार देण्यात येतील. आशा स्वयंसेविकेस आदिवासी भागाकरिता 11 हजार रूपये तर बिगर आदिवासी भागाकरिता 10 हजार रूपये रक्कम मिळावी, अशी त्यांच्या कामावर आधारित व्यवस्था आहे. आशा स्वयंसेविकांनी संप पुकारल्यानंतर त्यांच्या मानधनात 1500 रू व प्रवर्तक यांना 1700 रूपयांची वाढ केली होती. ती वाढीव सर्व 180 कोटी रूपयांची रक्कम मार्च अखेर देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.प्रज्ञा सातव, सर्वश्री सदाशिव खोत, शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता.
बीएड, एम.एड पदवीधारकांना शिक्षण सेवेकरिता स्पर्धा परीक्षेद्वारे मुभा
शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गासाठी सेवाप्रवेश नियमानुसार कोणत्याही शाखेतील पदवी ही अर्हता निश्चित केलेली आहे. बी.एड,, एम.एड हे पदवी उत्तीर्ण असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा अन्य स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेस बसता येईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
(हेही वाचा – हिजाब बंदीनंतर कर्नाटक सरकारचा आणखी एक मोठा निर्णय )
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व ब या संवर्गातील शिक्षणाधिकारी व तत्सम वर्ग 1 आणि उपजिल्हाधिकारी व तत्सम वर्ग 2 संवर्गाकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सेवाप्रवेशात सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदाच्या सरळसेवा प्रवेशाकरिता विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समतुल्य अर्हता धारण केलेल्या उमेदवारास पात्र ठरविण्याची तरतूद असल्याचेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community