सायबर गुन्ह्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत असून जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांत सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यासाठी पाच लाख फोन कॉल आले आहेत. या ११ महिन्यांच्या काळात मुंबईत सायबर फसवणुकीच्या ५५ हजार ७०७ तक्रारींची नोंद झाली. त्यात १ हजार १८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर फसवणुकीतील पैसे वाचविण्यासाठी पोलिसांनी १९३० क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या वर्षी हेल्पलाइनवर पाच लाखांहून अधिक विविध तक्रारीची नोंद झाली. (Cyber Fraud)
(हेही वाचा – Panvel-Karjat नवा कॉरिडॉर; सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार होणार)
गेल्या वर्षी याच कालावधीत मुंबईत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांची एकूण २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यातील केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले असले, तरी फसवणूक झालेली एकूण रक्कम पाहता त्याचे प्रमाण फार कमी आहे.
राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्याशी संबंधित साडेसहा सहस्र अवैध सीमकार्ड पोलिसांनी बंद केले आहेत.
१९३० या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन
सायबर गुन्ह्यांमुळे (cyber crime) आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे. एका चुकीमुळे पैसे जात आहेत. मात्र, नागरिकांनी न घाबरता तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास पैसे परत मिळू शकतात. सायबर गुन्हे उघडकीस आणणे आणि प्रतिबंध करणे, यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यांना अधिक प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम बनविण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले. (Cyber Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community