मुंबईतील १२९ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेत इमारतीच्या मंगलोरी कौलांसह छत आणि भिंतीचे डागडुजी करत रखरखाव केला आहे. तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून केलेल्या या नुतनीकरणामध्ये बाथरुममधील गळती दुर करण्याचा कामाचाही समावेश होता. परंतु या इमारतीमधील एकाही बाथरुमच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नसून या सर्व बाथरुमधूनच गळती लागलेली पहायला मिळत आहे. कंत्राटदाराच्या कामामध्ये याचा समावेश असतानाही उलट महापालिका मुख्यालयात इमारत देखभाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे काम आपल्या विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगत कंत्राटदारालाच पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मुंबईचे दमट हवामान व सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन, इमारतीच्या दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ होणे, नवीन भेगा तयार होणे, दगडांचे आवरण झिजणे आदी बाबींमुळे इमारतीचा बाहेरील भाग खराब दिसतो. ज्यामध्ये घुमट, तुळ्या, कमानी आदी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढवणे तसेच अनेक ठिकाणाहून होणारी गळती थांबवण्यासाठीची प्रकिया करणे आदी कामांच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले. यासाठी एम देवांग कन्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून विविध करांसह ९ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले जात आहे.
या नुतनीकरण तथा दुरुस्तीच्या कामामध्ये मंगलोर छत व त्यांच्या लाकडी बांधकामांची दुरुस्ती, छतावरील लाकडी फळ्या काढून दुरुस्ती करणे व नवीन बसवणे, छतांची गळती बंद करणे, बाथरुममधील गळती दुर करणे, लाकडी मजल्यांचे सांधे स्टेनलेस स्टील अथवा लोखंडी प्लेट द्वारे मजबूत करणे, पोटमाळ्यावरील लाकडी खांब मजबूत करणे, कमानीच्या दगडी आधार खांबांचे बळकटीकरण करणे, घुमटाचे ग्राऊंटींग करणे, खिडक्या व दगडांमधील पोकळी भरणे, जुन्या झालेल्या फरशी नव्याने बसवणे, छताचे लाकडी वासे पॉलिशिंग करणे, छतावरील मनोऱ्यांवर नवीन लाकडी नक्षीदार भाग बसवणे, बाह्य दर्शनी भागाची दुरुस्ती व जिर्णोध्दार करणे, बाह्य दगडी भिंतीची साफसफाई करणे, वाळवी प्रतिबंधक उपाययोजना व इतर कामे आदींचा सामावेश होता.
(हेही वाचा – Manholes : मुंबईच्या मॅनहोल्समध्ये आता स्टीलच्या जाळ्या)
मागील या कामांसाठी मागील वेळेस दीड वर्षांचा कालावधी लागला होता. परंतु यावेळेस हे दुरुस्तीचे काम अवघ्या दीड ते दोन महिन्यांमध्येच पूर्ण केले गेले. यावेळी जी २० च्या शिखर परिषदेच्या नावाखाली हे काम युध्दपातळीवर अधिकचे मनुष्यबळ वापरुन करण्यात आले. मात्र हे रंगरंगोटीला अधिक महत्व देताना कंत्राटातील मुळ कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कामांमध्ये बाथरुममधील गळती दुर करण्याचा समावेश होता. यासासाठी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सात बाथरुमच्या चाव्याही मागवून घेण्यात आले. परंतु चाव्या हाती घेतल्यानंतर या बाथरुमची दुरुस्ती करण्यातच आली नाही. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेरील बाथरुमची दुरुस्ती करण्यात येईल, असे आधी सांगितले. पण ही दुरुस्ती काही झाली. त्यामुळे या बाथरुममधील गळती आजही सुरुच आहे. अशाचप्रकारे इतर बाथरुममधील समस्या कायमच असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून ही दुरुस्ती करून घेण्याऐवजी आपण स्वत:च ही दुरुस्ती करू असे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जे काम कंत्राटदाराच्या कामांमध्ये आहे, ते काम महापालिका मुख्यालय इमारतीच्या देखभाल विभागाचे अधिकारी आपण करतो म्हणून का सांगत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community