कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रवेश झालेल्या नागपुरातील आड विदारक स्थिती पाहायला मिळत आहे. नागपुरातील हिंगणा तालुक्यातील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातील सगळ्यांचीच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले सर्व विद्यार्थी हे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असून महाविद्यालय परिसरातील वसतिगृहातच हे विद्यार्थी राहत होते.
५० विद्यार्थी क्वारंटाईन!
कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना महाविद्यालयाच्याच संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात तिसरी लाट आल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालयात दहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा : अफगाणिस्तानचे नवे मंत्रिमंडळ दहशतवादीच! कोणता मंत्री किती मोठा दहशतवादी?)
दिवसभरात १८ कोरोना रुग्णांची नोंद
दरम्यान नागपुरात मंगळवारी १८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. हे रुग्ण वाढ पाहून चिंता व्यक्त होत आहे. तर दिवसभरत ९ रुग्ण बरे झाले. नागपुरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या ४ लाख ८२ हजार ९०६ वर पहोचली आहे. तर १० हजार ११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community