दिवाळीनिमित्त अनेक लोक सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जातात. त्यामुळे रेल्वे- एसटी गाड्यांचे आरक्षण फुल्लं झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात १ हजार ४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व एसटी गाड्या २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान धावणार आहेत. मात्र, या एसटीच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला असल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
( हेही वाचा : ३ हजारात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन; नवरात्रीसाठी एसटीची विशेष सुविधा )
हंगामी भाडेवाढीचा निर्णय
दिवाळीत महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे चाकरमानी वर्ग गावी जातात किंवा पर्यटनस्थळांना भेट देतात. यंदा दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीच्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती विभागातून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच पुणे-नागपूर मार्गावर विशेष शिवनेरी बसेस धावणार आहेत.
२० ऑक्टोबरपासून ११ दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ
२० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ११ दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ लागू असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच याची माहिती महामंडळाकडून प्रवाशांना दिली जाईल अशी माहिती देण्यात आली. या १० टक्के भाडेवाढीमुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community