आजी-आजोबांचे घरातील महत्त्व आणि त्यांचे नातवंडांशी असलेले नाते, त्यांच्यावरील निर्व्याज प्रेम! हा घराघरांतील जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असतात. त्यामुळे आपल्या नातवंडांना दिवसभर सांभाळणे, त्यांचा सर्वांगीण विकास या जबाबदाऱ्या पालकांप्रमाणे आजी-आजोबाही सांभाळत असतात. त्यामुळे यावर्षी 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये ‘आजी-आजोबा’दिवस साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पाल्याची जडणघडण, त्यांच्याशी केलेले हितगुज याशिवाय शाळेतील अनुभव यातून मुलांनी अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात.त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून त्याकरिता आजी-आजोबांनी आमंत्रित केले जाणार आहे. यामध्ये मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे,ही उद्दिष्टे साध्य होण्याकरिता शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा होणार आहे.
मुलांवरील संस्कारवाढीच्या दृष्टीने हा दिवस शाळेत साजरा होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबर रोजी आजी-आजोबा दिवस असून राज्य, जिल्हा आणि शाळा स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. त्यामुळे शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातही या दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडून यांनी सांगितली.
आजी-आजोबांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
रविवारी सकाळी विद्यार्थी आपल्या आजी-आजोबांना शाळेत घेऊन येणार. तेथे त्यांची ओळख इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना करून देणार. आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच विटीदांडू, संगीत खुर्ची अशा खेळांचं आयोजन. पारंपरिख वेशभूषेमध्ये आजी-आजोबा शाळेत येतील.विद्यार्थ्यांना आपल्या आजी-आजोबांसोबत एखादी कलाकृती साजरी करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी पर्यावरण, झाडे लावण्याचे महत्त्व, आजीचा बटवा इत्यादी गोष्टींचे महत्त्वही मुलांच्या मनावर बिंबवण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाणार आहे.