आफ्रिकेतील कोरोनाचा अधिक घातक ओमायक्रोन या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. असे असताना मागील १५ दिवसांत आफ्रिकेतून तब्बल ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील १०० प्रवासी तरी मुंबईत राहणारे आहेत, त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेने तरी या प्रवाशांना शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
पुन्हा चाचण्या करणार
ज्या वेळी हे प्रवासी मुंबईत दाखल झाले, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी केली होती, तेव्हा ते निगेटिव्ह आढळून आले होते, त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे. मात्र त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता म्हणून या प्रवाशांना शोधून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
(हेही वाचा मोहित भारती यांची बदनामी केल्यामुळे मलिकांना अटक)
ठाण्यात प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा
ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. विमानतळावर करण्यात आलेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले. खबरदारी म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सात जणांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या सात जणांपैकी दोन जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला होता, तर उर्वरित पाच जणांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community