येत्या दोन महिन्यांत म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत आपण देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार आहे. पूर्वी क्रीडा अर्थसंकल्प केवळ 800 कोटी रुपयांचा होता तो केंद्र सरकारने आता जवळपास 3,200 कोटी म्हणजे चार पट केला आहे. या खेलो इंडिया केंद्राच्या संचालनाची जबाबदारी जे चॅम्पियन ऍथलेट आहेत त्या माजी खेळाडूंना देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तसेच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईकर नागरिकांसाठी ‘आरोग्य आपल्या दारी’ संकल्पना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)
देशातील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी देशांमध्ये क्रीडा अनुकूल वातावरण नव्हते परंतु आता एशियन गेम्स मध्ये पदकांची शतकपूर्ती करून भारताने आपला कीर्तिमान स्थापन केला आहे. मल्लखांबसारख्या महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांना तसेच देशातील इतर पारंपारिक खेळाच्या खेळाडूंना राष्ट्रीय तसेच खेलो इंडिया गेम्सचा भाग बनवले आहे. या पारंपारिक खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपण नेणार असून या खेळांना ऑलंपिकमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर विदर्भातील खेळाडूंना सहभागी करण्यासाठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सिलेक्टर या ठिकाणी पाठवून येथील स्थानिक प्रतिभा ओळखून त्या खेळाडूंना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या शिबिरांमध्ये नेण्यात येईल आणि त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाईल असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट केलं . खेळाडूंना मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मंच मिळणे, मानसन्मान मिळणे , त्यांना हातभार लावण्यासाठी अर्थसहाय्य मिळणे अश्या सर्व संधी एकत्रितरित्या खासदार क्रीडा महोत्सवात मिळत असल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या विमापत्राचे ही प्रातिनिधिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजक, पदाधिकारी ,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध शाळातील विद्यार्थी, क्रीडा संघाचे प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खेळातून तरुण पिढीचे व्यक्तित्व साकार…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, गेल्या पाच वर्षापासून या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे यावर्षी जवळपास 65 हजार खेळाडू नागपूरच्या 66 मैदानावर 56 प्रकाराचे खेळ खेळणार आहेत . यामागील एकच उद्देश आहे की नागपूर क्षेत्रातील खेळाडू राज्य तसेच देशाच्या स्तरावर जाऊन एक चांगले खेळाडू बनतील आणि त्यांच्या या कार्यातून देशाचा अभिमान वाढेल. नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूरच्या क्रीडा मैदानाच्या विकासासाठी 200 कोटी रुपये दिले असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान दोन स्विमिंग टॅंक बनतील असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितलं. खेळातून तरुण पिढीचे व्यक्तित्व साकार होते त्याचप्रमाणे खेळाडू वृत्ती सुद्धा वृद्धिंगत होते त्यामुळे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलं.
हेही पहा –