भाऊ-बहीण यांच्यातील निस्सीम प्रेमाचं प्रतिक, बहीण-भावाच्या अतूट नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी बहीण भावाला राखी बांधते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारामतीमधील बहीण-भावांनी रक्षाबंधन साजरं केलं आहे. पण हे रक्षाबंधन फार खास आहे. कारण, या रक्षाबंधनाने शंभरी पूर्ण केली आहे.
रक्षाबंधनाचा शतक महोत्सव
आपल्या लाडाची बहीण लग्न होऊन सासरी गेल्यावर प्रत्येक भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी तिची वाट पाहत असतो. तेवढ्याच आतुरतेने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी ती बहीणही धावत माहेरी येत असते. याचा प्रत्यय बारामती जवळील सटलवाडी येथे पहायला मिळाला. आयुष्याचे शतक पार केलेल्या म्हणजेच 104 वर्षांच्या अनुसया ज्ञानोबा गायकवाड या बहिणीने आपल्या 102 वर्षांच्या गजानन गणपत कदम या धाकट्या भावाला राखी बांधली. यावेळी या दोघा बहीण-भावांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे क्षण पाहून नातवंडांनाही आनंद झाला. हा क्षण अनुभवण्यासाठी नातेवाईकांसह गावातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.
भला मोठा गोतावळा
अनुसया आजी आता 104 वर्षांच्या झाल्या आहेत. वयामुळे त्यांना आता स्वतः दौंड तालुक्यातील कासुर्डी येथून सटलवाडीत आपल्या माहेरी येणे शक्य नाही. पण, त्यांची नातवंडे किंवा परतुंडे त्यांना रक्षाबंधनासाठी आवर्जून घेऊन येतात. अनुसया आजींना 9 मुली, 2 मुले, 37 नातू, 45 परतुंडे, 12 खापर परतुंडे तर त्यांच्या बंधूंना म्हणजेच गजानन आजोबांना 2 मुले, 6 मुली, 23 नातू, 25 परतुंडे, त्यांच्या घरी असा भला मोठा गोतावळा आहे. या 100व्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने या शंभरी पार केलेल्या बहीण-भावाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
Join Our WhatsApp Community