-सचिन धानजी
मुंबई शहरातील ए ते जी/उत्तर विभाग या एकूण ९८.००३ कि.मी. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे साफ करण्यात येणार असून चार वर्षांसाठी अर्थात ३१ महिन्यांच्या कामांसाठी तब्बल १०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी चार भागांमध्ये विभागून ही निविदा काढली असून त्यात केवळ तीन कंपन्यांनी भाग घेतला. या चारही निविदेत या कामात सर्वात जास्त अनुभव असलेल्या मिशिगन या कंपनीला समान कामाच्या अनुभवाची पात्रता वाहनांच्या मालकीचे निकष पूर्ण न केल्याने या कंपनीची निविदा बाद ठरवण्यात आली. तर उर्वरित दोन कंपन्यांपैंकी एका कंपनीला तीन भागांचे तर एक कंपनीला एका भागाचे काम सोपवण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पर्जन्य जलवाहिनी विभागात कंत्राटदारांवर संगनमत करून केल्याचा ठपका ठेवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर या निविदेतील कंत्राटदारांची चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई शहर व उपनगरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. शहर विभागात जमिनीखाली असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचे, बॉक्स व आर्च ड्रेनेजच्या मोठ्या प्रमाणावरील जाळ्यांची देखभाल या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने करण्यात येते. या खात्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्य बळ व मशिनरीच्या सहाय्याने या भूमिगत जलवाहिन्यांची सफाई केली जाते. परंतु दोन मनुष्य प्रवेशिकांमध्ये (मॅनहोल्स) सर्वसाधारणपणे ३० मीटर एवढे अंतर असते. जे साफ करण्याकरिताची सुसज्ज यंत्र सामुग्री व कुशल मनुष्यबळ या खात्याकडे उपलब्ध नाही.
(हेही वाचा – BMC : महापालिकेला रस्त्यांच्या कामाचा अनुभव अमान्य;पण मेट्रोच्या रेल्वे कामाचा अनुभव मान्य)
भूमीगत पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये असलेल्या अंधारामुळे व विषारी वायू यामुळे आणि तेथे हवा खेळती नसल्यामुळे हे काम खात्यांतर्गत मनुष्यबळाने करुन घेणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून या खात्याने सन २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता २४ महिन्यांसाठी मुंबई शहरातील ६३ कि.मी. भूमीगत पर्जन्य जलवाहिन्यांचे व्यवस्थित स्वच्छता करण्याबाबतची निविदा मागवून काम केले. या कामामुळे शहर विभागातील पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा होऊन पावसाळ्याचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पर्जन्य जलवाहिनी विभागाने केला आहे. त्याच धर्तीवर कुर्ला एल. बी. एस. मार्ग येथील ३.८ कि.मी. रस्त्यालगतच्या पेटीका वाहिनीचे सन २०२२ च्या पावसाळयापूर्वी व्यवस्थित स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे एलबीएस मार्गाला जोडणा-या गलीच्छ वस्त्या व मिठी नदीच्या पातमुखावरील भागाला मोठा दिलासा मिळाला होता. तसेच शीव व कुर्ला स्थानकाच्या रेल्वे मार्गावर मागील वर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नव्हते. त्यामुळे एकप्रकारे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता.
हा अनुभव लक्षात घेता मुंबई शहर भागातील ए ते जी/उत्तर विभाग या कुलाबा ते माहिम-धारावी या एकूण ९८.०३ कि.मी. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे ३१ महिन्यांच्या कालावधीसाठी (पावसाळा वगळून) चांगल्या स्थितीत स्वच्छता करण्याचे काम एकूण ५ भागांत विभागणी करुन एकूण कामांसाठी ई -निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये शीव ते परळ- शिवडी या एफ उत्तर व एफ दक्षिण हे विभाग वगळून ही निविदा काढण्यात आली. शहरातील एकूण ९ विभाग कार्यालयांपैंकी ७विभाग कार्यलयांच्या हद्दीतील कामांसाठी चार भागात विभागून काढण्यात आलेल्या निविदेत केवळ मिशिगन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्यन पंप्स अँड इन्व्हारनो तीन कंपन्यांनी भाग घेतला यापैकी मिशिगन ही कंपनी निविदा अटीतील शर्ती पूर्ण न केल्याने बाद ठरली. त्यामुळे दोन कंपन्यांपैकी एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी तीन कामांसाठी आणि आर्यन पंप्स अँड इन्व्हारनो या कंपनीला एका कामासाठी पात्र ठरली आहे. या दोन्ही कंपन्यांनी ४.४ टक्के अधिक दराने बोली लावत ही कामे मिळवली आहेत.यामध्ये जलवाहिनीच्या मीटर प्रमाणे सफसफाईचे पैसे कंत्राटदाराला अदा करण्यात येणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशाप्रकारे विभागात भूमिगत पर्जन्य जलवाहिनी साफ करण्यासाठी केला जाणार खर्च
विभाग : ए व बी
नियुक्त कंत्राटदार:एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
चार वर्षांसाठी होणारा खर्च: २०.४८ कोटी रुपये
विभाग : सी व डी
नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
चार वर्षांसाठी होणारा खर्च: २९.३७ कोटी रुपये
विभाग : ई
नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
चार वर्षांसाठी होणारा खर्च:२१.४३ कोटी रुपये
विभाग : जी/ उत्तर, जी/दक्षिण
नियुक्त कंत्राटदार :आर्यन पंप्स अँड इन्व्हारनो
चार वर्षांसाठी होणारा खर्च: ३६.३१ कोटी रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community