विद्यार्थ्यांनो तयारीला लागा…ऑफलाईन होणार परीक्षा!

113

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात संभ्रमाचे वातावरणाची निर्माण झाले आहे.  मात्र, बोर्डाच्या परीक्षा पारंपरिक तसेच लेखी स्वरूपात होतील, तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. अगदीच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास परीक्षांबाबतचा निर्णय शासनाच्या आदेशानुसार घेतला जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

शिक्षण मंडळ ठाम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी, तसेच समाज माध्यमांवर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा बोर्डाच्या परीक्षा संकटात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील लक्षावधी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

( हेही वाचा : दहशत कायम! उपराजधानीत ओमायक्रॉनचा शिरकाव )

२५ टक्के अभ्यासक्रम वगळून परीक्षा होणार ?

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्याचाच प्रयत्न आहे. मात्र, दुर्दैवाने काही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास शासनाच्या आदेशानुसार कृती केली जाईल. तेव्हा मूल्यांकन कसे करावे, यासाठीचा विचारही सुरू करण्यात आला आहे.’

दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान आयोजित करण्याच्या दृष्टीने मंडळाने तयारी सुरू केली आहे. मध्यंतरी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात वरिष्ठ शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शैक्षणिक संघटना व तज्ज्ञांची सहविचार सभा घेतली होती. तेव्हा गेल्या वर्षी कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमाचा भाग वगळूनच उर्वरित भागावर परीक्षा होतील, असे ठरवण्यात आले. राज्य सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात या मुद्द्याचाही समावेश आहे. त्यावरही निर्णय होणे अपेक्षित आहे. असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.