रेल्वेमध्ये दर दिवसाला ११ अलार्म चेन पुलिंगची प्रकरणे

106

मध्य रेल्वे मुंबई विभावात अलार्म चेन पुलिंग (एसीबी)च्या घटना घडत असून १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ३,४२४ अलार्म चेन पुलिंगची प्रकरणे नोंदवली गेली. तर या चालू वर्षात १ जानेवारी, २०२३ ते १० मार्च, २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ७७८ अलार्म चेन पुलिंगची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे चालू वर्षातील सरासरी प्रकार पाहिल्यास सुमारे ११ प्रकरणे ही घडत असल्याची बाब समोर आली आहे.

( हेही वाचा : जुनी पेन्शन लागू होणार? सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक )

रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गाडीसाठी स्थानकावर उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे अथवा चढणे इत्यादी अनावश्यक तथा तकलादू कारणांसाठी प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.

ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमुळे केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या चालण्यावरच परिणाम होत नाही तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल तथा एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी असे प्रकार होत असल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

मध्य रेल्वे मुंबई विभाग अशा अवास्तव अलार्म चेन पुलिंगच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ या वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ३,४२४ अलार्म चेन पुलिंग प्रकरणे नोंदवली गेली आणि १,९८० प्रवाशांवर कारवाई करण्यात येऊन रु. ९.९० लाख दंड वसूल करण्यात आला.

या चालू वर्षात १ जानेवारी, २०२३ ते १० मार्च, २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ७७८ अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणे नोंदवली गेली आणि ६६१ प्रवाशांवर कारवाई करण्यात येऊन रु.४.५४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा प्रकार करू नका, ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे. आवश्यक नसताना अलार्म चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.