हज यात्रेचे आयोजन करतो असे सांगून राज्यभरातील शेकडाे भाविकांकडून ११ कोटी जमा करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या दोन वर्षापूर्वी उघडकीस आला होता. या फसवणुकी संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जवळपास १५०० नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र दोन वर्षानंतरही आरोपींना अटक करण्यात आली नाही. तसेच याचा तपास करण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी हज यात्रेकरु कृती समितीकडून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात पोलिस आयुक्तांना सूचना केल्या जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी समितीला दिले.
आरोपी परदेशात पळाला!
यावेळी वंचित हज यात्रेकरु कृती समितीचे अजिज पठाण, रियाज सय्यद, शकिल सय्यद, जमीर दबीरभाई शेख, झहीर शेख, अफजल पठाण, एजाज शेख, प्रा.मोईन खान, परवेज अन्सारी, मुजफ्फर मन्सुरी आदी उपस्थित होते .कोट्यवधीच्या फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास करण्यास पाेलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या नागरिकांकडून करण्यात आला. दोन वर्ष उलटूनही कोणत्या प्रकारचा तपास केला जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील ‘जहान’ इंटरनॅशनल टूरचा मालक अब्दुल मतिन मनियार व इतर संशयितांनी हजच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी शहरातील मुंबईनाका पाेलिस ठाण्यात व गुन्हे शाखेत करण्यात आली होती. यानंतर कोणत्याही प्रकारची वाट न पाहता संशयित अब्दुल मतिन मनियार परदेशात पसार झाला, तर इतर संशयित नाशिक जिल्ह्यातच राहत आहेत.
(हेही वाचा : मराठा समाजाला जातीनिहाय नाही, तर ईडब्ल्यूएस आरक्षण!)
पोलिसांच्या तपासावर शंका!
मागील वर्षी अचानक टूरचे ऑफिस बंद पडल्याने तसेच या फसवणुकीसंदर्भात नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत यासंदर्भात तक्रार नोंदवली. तर या सर्व प्रकरणादरम्यान टूरच्या माध्यमातून हज यात्रेला जाणारे शेकडो भाविकांना हज यात्रेला न पाठवता त्यांची ही फसवणूक केल्याचे उघड झाले. या घटनेनंतर शहरातील हजसाठी जाणारे शेकडो भाविकांनी एकत्र येऊन अब्दुल मतिन मनियार यांच्यासह त्यांच्या एजंट यांच्याविरोधात हजचे पैसे घेऊनही यात्रेला न पाठवत फसवणूक केल्याची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, या तक्रारीनंतर ही पोलिसांकडून हवा तसा तपास करण्यात आलेला नसल्याने अारोपींना पकडण्यास अपयश आले आहे.
Join Our WhatsApp Community