पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नाल्यांच्या सफाईवर ११ कोटींचा खर्च

11 crore will be spent on cleaning the drains under the East and West Expressway
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नाल्यांच्या सफाईवर ११ कोटींचा खर्च

एमएमआरडीएच्या ताब्यातून पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग ताब्यात आल्यानंतर आता या महामार्गाखालील नाल्यातील गाळ महापालिकेच्यावतीने काढला जाणार आहे. यंदा प्रथमच महापालिकेच्यावतीने पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील कल्व्हर्टमधील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून या नालेसफाईवर तब्बल ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

पश्चिम उपनगरांमधील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध छोटे व मोठे नाले, पेटीका नाले तसेच रस्त्यालगत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये वाहून येणारी माती, घाण, कचरा आदी जमा होतो. या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमधून सांडपाणी व काही प्रमाणात मल वाहून नेले जात असले तरी याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्याने या नाल्यातील प्रवाह सुरळीत राखण्यासाठी या वाहिन्यांमधील गाळाची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर १६ मोरी पेटीका अर्थात कल्व्हर्ट असून या मार्गावरील पाण्याचा निचरा यातून योग्यप्रकारे होण्यासाठी यातील गाळाची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे दोन्ही द्रुतगती महामार्ग ३ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले असून त्यामुळे या दोन्ही मार्गावरील कल्व्हर्टची सफाई करण्यासाठी यंदा महापालिकेच्यावतीने स्वतंत्र निविदा मागण्यात आल्या होत्या. यासाठी पूर्व उपनगरांसाठी दोन निविदा आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशाप्रकारे पाच निविदा मागवण्यात आल्या होत्या. यासाठी पाच स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले, कल्व्हर्टची सफाई

१) कंत्राटदार : राठोड भाग्यजीत अँड कंपनी
कंत्राट किंमत : ३ कोटी ७३ लाख रुपये

२) कंत्राटदार : आर डी एंटरप्रायझेस
कंत्राट किंमत :  २ कोटी ०५ लाख रुपये

३) कंत्राटदार : पी व्ही एंटरप्रायझेस
कंत्राट  किंमत : १ कोटी ९८ लाख रुपये

पूर्व द्रुतगती महामार्गावरील छोटे नाले व कल्व्हर्ट सफाई

१) विद्याविहार ते मुलुंड परिसर
कंत्राटदार : एन एम इन्फास्ट्रक्टचर्स
कंत्राट :  ३ कोटी ०३ लाख रुपये

२) कुर्ला ते चेंबूर,देवनार,गोवंडी
कंत्राटदार : शीतल इन्फ्रा प्रोजेक्ट
कंत्राट : ८३ लाख रुपये

(हेही वाचा – प्रशासनाकडून इन्फ्ल्यूएंझा व कोविडबाबत सुरक्षात्मक उपाययोजना जारी)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here