मुंबईत ११ इन्फ्लूएन्झा रुग्णांची नोंद : कस्तुरबा रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी बेड्स

मुंबईत इन्फ्लूएन्झाचे ११ रुग्ण आढळून आले असून या बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय १० खाटांचा एक स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आला आहे. दरम्यान, एच ३ एन २ विषाणुचे देशात ६०० हुन अधिक रुग्ण आढळले असून राज्यात ५८ इन्फ्लूएन्झा रुग्णांची नोंद झाली आहे. ताप खोकला सर्दी असल्यास वेळीच तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.

( हेही वाचा : इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार घ्या; H3N2 व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांचे आवाहन)

राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत दुपटीने वाढ होत आहे. त्यात स्वाईन फ्लू, एच ३ एन २ इन्फ्लूएन्झाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेंशन वाढले आहे. इन्फ्लूएन्झाचा शिरकाव मुंबईत झाला असून ११ रुग्ण आढळले असून पालिका व खाजगी रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचे विशेष विषाणू रुग्णालय असलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

श्वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढताहेत

केंद्रीय आकडेवारीनुसार जानेवारीत देशभरात श्वसनाचे आजार आणि इन्फ्लुएन्झाचे ३ लाख ९७ हजार रुग्ण नोंदवले गेले होते. हा आकडा फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३६ हजार ३६ हजारांवर पोहोचला आहे. मार्चच्या पहिल्या केवळ ९ दिवसांत या आजारांच्या रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजारांवर पोहोचली आहे.

अशी घ्यावी काळजी

  • संसर्गजन्य आजारात तोंडावाटे किंवा नाकातून बाहेर पडणार्‍या स्रावातून आजार पसरत असल्यामुळे मास्क वापरणे,
  • वारंवार हात धुणे
  • गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सर्दी, खोकला आणि तापासारखी लक्षणे असल्यास इतरांपासून दूर राहणे अशी काळजी घ्यावी. तसेच लक्षणांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

देशातील इन्फ्लुएन्झाचे रुग्ण

  • महाराष्ट्र – ५८ रुग्ण, दोन मृत्यू
  • तमिळनाडू – ५४५ रुग्ण
  • गुजरात – १०८ रुग्ण
  • पंजाब – एकूण ५८ रुग्ण

राज्याची स्थिती – १ जानेवारी ते १३ मार्च

  • आतापर्यंत तपासण्यात आलेले रुग्ण – २५६६२४
  • आढळलेले स्वाइन फ्लू रुग्ण – ३०३
  • इन्फ्लुएन्झाचे एकूण रुग्ण – ५२
  • रुग्णालयात दाखल रुग्ण – ४८
  • एन्फ्लुएन्झामुळे झालेले मृत्यू – २
  • स्वाइन फ्लूमुळे झालेले मृत्यू – ३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here