Dialysis center : धारावीत १२ खाटांचे डायलिसिस केंद्र खुले

लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण रविवारी करण्यात आले

162
Dialysis center : धारावीत १२ खाटांचे डायलिसिस केंद्र खुले
Dialysis center : धारावीत १२ खाटांचे डायलिसिस केंद्र खुले

धारावीमध्ये लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव) च्या नेफ्रोलॉजी विभागाच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर (Dialysis center) उभारण्यात आले. या ठिकाणी १२ डायलिसिस मशीन आणि एक आरओ प्लांटची सामाजिक सहभागातून मोफत स्वरूपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शीव रुग्णालयातून शिफारस झालेल्या नियमित डायलिसिस उपचार घेणार्‍या स्थिर रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १२ पैकी ९ मशीन नियमित रुग्णांसाठी तर ३ मशीन्स या व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी असतील.

धारावीमध्ये लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते झाले, याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार कॕप्टन तमिल सेल्वन या प्रसंगी उपस्थित होते. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी, नागरी वस्ती वाढताना अधिकाधिक नागरी सुविधा पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येक रूग्णालयाच्या भागात डायलिसिस सेंटरची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. धारावीसारखा घनदाट लोकसंख्येच्या भागात नागरिकांचे आयुष्यमान उंचावताना त्यांना सर्वोत्कृष्ट नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने डायलिसिस सुविधा धारावीकरांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहोत, असे त्यांनी सांगितले. धारावीतील डायलिसीस सेंटरचे मॉडेल हे इतर रुग्णालयांसाठी आदर्श ठरावे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या गरजू रूग्णांना राहत्या ठिकाणाजवळ डायलिसिस सुविधा मोफत उपलब्ध व्हावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार धारावीत डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धारावीतील मॉडेल हे इतर रुग्णालयातही अंमलात यावे, असेही केसरकर याप्रसंगी म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयात असणारी सेवा पुरवण्याची क्षमता पाहता मुंबईत स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. शीव रूग्णालयातील अधिष्ठाता मोहन जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय वेगाने केलेल्या कामाचा नवा आदर्श इतर रूग्णालयांसमोर ठेवला असल्याचे कौतुकही केसरकर यांनी केले.

नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

धारावीतील नागरिकांची अनेक दिवसांपासून डायलिसिस सेंटर सुरू करण्याबाबत मागणी होती. नगरसेवकांनीही महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, एखाद्या खासगी रुग्णालयात देण्यात येणार्‍या सुविधेइतकीच उत्तम वैद्यकीय सुविधा धारावी रूग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे धारावीचे मॉडेल हे इतर रूग्णालयासाठी आदर्श ठरणार आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

 शीव रुग्णालयाचा भार कमी होईल !

शीव रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार अवघ्या दोन महिन्यात ही सुविधा निर्माण केली आहे. संडे फ्रेंड्स आणि रॉयल स्वस्तिक सोसायटी यांच्या माध्यमातून डायलिसिस केंद्रात मॉनिटर आणि आयसीयूची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डायलिसिस सुविधेसाठी तंत्रज्ञ, डॉक्टर्स, परिचारिका आदींची टीम कार्यरत असेल. दिवसा सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत रूग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. या सुविधेमुळे शीव रूग्णालयाच्या डायलिसिस सुविधेवर येणारा भार कमी होईल. याठिकाणी सायन रूग्णालयातून पाठवण्यात आलेल्या नियमित स्थिर रूग्णांसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध असेल. दहा दिवसांची डायलिसिसची मोफत सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शीव रूग्णालयाच्या मुख्य डायलिसिस केंद्रात जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४५०० रूग्णांना डायलिसिस सुविधा देण्यात आली आहे. आजपासून सुरू झालेल्या विस्तारीत इमारतीतील सुविधेच्या माध्यमातून १२ आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध केली आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.