भिवंडीतील एका छोट्याशा गावातून ठाणे गुन्हे शाखेने तब्बल १२ हजार जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त केला आहे. येथील कालवार या गावातील दोन खोल्यांमध्ये हा साठा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकली असता पोलिसांना सुमारे ३ हजार ०८ डिटोनेटर्स आणि १२ हजार जिलेटीनच्या कांड्यांचा साठा प्राप्त झाला. हा सर्व साठा दोन खोल्यांमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुरुनाथ म्हात्रे याला अटक केली आहे.
(हेही वाचा : प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )
गुरुनाथ म्हात्रेला २२ मेपर्यंत पोलिस कोठडी!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुनाथ म्हात्रे याने हा साठा अवैधरित्या जमा केला होता. तसेच त्यासाठी सुरक्षा मानकांचा कसलाही अवलंब केला नव्हता. गुरुनाथ म्हात्रे याचा बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. मात्र त्याने या विस्फोटकांचा साठा का केला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गुरुनाथ याला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला २२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता गुरुनाथ याच्याकडे हा साठा कुठून आणि कसा आला, त्याला कुणी मदत केली, तो साठा त्याला कशासाठी वापरायचा होता, याचा तपास करत आहेत. दरम्यान पोलिसांनी हा सर्व साठा पालघर येथे सुरक्षा मानकांचा अवलंब केला जातो, तिथे सुरक्षितपणे हलवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुनाथ म्हात्रे विरोधात सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणे, भादंवि आणि बेकायदा स्फोटके बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community