जेजे रुग्णालायीतल मोडक्या आणि अस्वच्छ वसतीगृहांसाठी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या प्रकरणी सोमवारी हिंदूस्थान पोस्टने जेजेतील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. जेजेतील वसतीगृहातील पाण्याच्या टाकीत मच्छरांची अंडी या शीर्षकांतर्गत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
आठ मजली जुन्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीत केवळ १०० खाटा उपलब्ध असताना ३०० डॉक्टर्स राहतात. अपु-या जागेमुळे जेजेतील विद्यार्थ्यांना बीएमएस आणि आरएमओ या दोन अस्वच्छ वसतीगृहात पुरुष आणि महिला निवासी डॉक्टर्स राहतात. जागेच्या अभावामुळे महिला डॉक्टरांनी बाथरुममधील व्हरांड्यातच खाटांची व्यवस्था केली. तर पुरुषांच्या वसतीगृहात मिळेल त्या जागेत चटई जमिनीवर ठेवत निवासी डॉक्टर्स वसतीगृहात राहत होते. तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उपलब्ध नव्हती. पाण्याच्या कूलर टँकमध्ये तर मच्छरांची अंडी घालण्याची जागा तयार झाली होती. मच्छर, उंदीरांच्या सुळसुळाटामुळे लॅप्टोस्पायरोसिसपासून ते डेंग्यू,मलेरियापर्यंत सर्व आजार निवासी डॉक्टरांना झाल्याने डॉक्टर्सचा संताप अनावर झाला. अस्वच्छ वातावरणात राहिल्याने मानसिक आजाराने ग्रासल्याकडेही जेजे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्षच राहिले. या संपूर्ण प्रकरणावर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बातमी प्रसिद्ध होताच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने या प्रकरणाची दखल घेतली. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनाही निवासी डॉक्टरांनी तक्रार केली. अखेर वसतीगृहाच्या डागडुजीसाठी १३ कोटींचे अनुदान दिले जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.
( हेही वाचा: ‘मगर’ पकडणार कोण? )