राज्यात म्युकरमायकोसिसच्या प्रत्येक रुग्णाची नोंद केली जाणार आहे. त्या सर्व रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत. त्याकरता राज्यभरात १३१ रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात यातील एक रुग्णालय असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
खासगी रुग्णालयातही मोफत उपचार व्हावेत!
आजमितीस म्युकरमायकोसिसच्या २ हजार २४५ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील १ हजार ०७ रुग्णांवर मोफत उपचार सुरु आहेत. त्यामध्ये अँफोटेरेसीन-बी या इंजेक्शनचाही खर्च सरकार करत आहे. सध्या काही खासगी रुग्णालयांमध्येही यावर उपचार होत आहेत. तिथेही मोफत उपचार व्हावेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी राज्य सरकार याआधीच कोर्टात दाखल झालेल्या याचिकेच्या माध्यमातून विनंती करणार आहे. ज्याप्रकारे खाजगी रुग्णालयांमध्ये कोविडसाठी कॅपिंग देण्यात आले आहे, तसेच कॅपिंग म्युकरमायकोसिससाठी देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
अँफोटेरेसीन-बी करता ग्लोबल टेंडर!
म्युकरमायकोसिससाठी जे अँफोटेरेसीन-बी इंजेक्शन लागते, त्या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. केंद्र सरकारकडून १ जूनला ६० हजार इंजेक्शन महाराष्ट्रात पाठवले जाणार आहे, त्यांचे वितरण रुग्ण संख्या पाहून करण्यात येणार आहे, असेही मंत्री राजेश टोपे म्हणाले.
(हेही वाचा : अजित दादा – राऊत यांच्यातील वाद मिटता मिटेना! मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार)
फायर ऑडिट तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश!
प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना तात्काळ फायर ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या जिल्ह्यांध्ये राहिले असेल त्यांना समयमर्यादा घालून दिली आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची आधीच जिल्हा पातळीवर तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले.
लसींसाठी केंद्रानेच ग्लोबल टेंडर काढावे!
लसीकरणासाठी राज्यांनी ग्लोबल टेंडर काढले तरी त्याला केंद्राची परवानगी लागते, म्हणून त्याला प्रतिसाद मिळत नाही, म्हणून फायझर, मॉडर्ना किंवा स्पुतनिक या विदेशी लसींसाठी केंद्रानेच ग्लोबल टेंडर काढावे, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच आयात धोरण तयार करावे, असेही मंत्री टोपे म्हणाले.
येत्या गुरुवारी लॉकडाऊनवर निर्णय!
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत येत्या गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले.
Join Our WhatsApp Community