महापालिकेच्या १४१ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या केवळ निम्म्याच कर्मचारी, अधिकाऱ्यांना ५० लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. महापालिकेचे जे एकूण २५९ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यातील केवळ १४१ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना  ५० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र आजही ११९ कर्मचाऱ्यांचे नातेवाईक विविध कारणांमुळे या लाभापासून वंचित असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारला पाठवलेल्यापैकी ठराविक दावेच मंजूर

मुंबई महापालिकेतील आजवर एकूण ७,०६८ कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा झाली असून त्यातील ६,५२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र कोविडची बाधा झालेल्या रुग्णांपैकी आजवर एकूण २५९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या आरोग्य विभागासह फ्रंटलाईन वर्करला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या नियमानुसार केवळ प्रत्यक्षात डॉक्टर आणि नर्सेससह इतर रुग्णालयीन कर्मचारीच या आर्थिक लाभासाठी पात्र ठरत होते. त्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या ५० लाख रुपयांचे दावे केंद्र सरकारला पाठवल्यानंतर त्यातील काही ठराविक दावेच मंजूर करण्यात आले आणि उर्वरीत दावे त्यांनी फेटाळले. त्यामुळे सरकारने फेटाळलेल्या दाव्यांवर महापालिकेच्यावतीने निर्णय घेत मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा रश्मी ठाकरेंची राबडी देवीशी तुलना! भाजपचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात)

११९ दाव्यांमधील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत 

महापालिकेच्या मृत्यू पावलेल्या २५९ दाव्यांपैकी सरकारने १७० दावे नाकारले. त्यामुळे सरकारच्यावतीने केवळ २२ दावे मंजूर करण्यात आल्याने त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर जे दावे नाकारले, त्यातील १७० दाव्यांपैकी ११९ दावे मंजूर करत महापालिकेच्यावतीने मृतांच्यावतीने ५० लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासनाचे उपायुक्त मिलिन सावंत यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आज सरकारने नाकारलेल्या  १७० दाव्यांपैकी ११९ दाव्यांमधील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. एकूण मृतांपैकी २२२ कामगारांच्या मृत्यूबाबतचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तर केवळ ३७ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबतचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ज्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी कागदपत्रे तसेच इतर बाबींच्या अडचणी असल्याने त्यांचे दावे निकालात निघालेले नाही. परंतु मृतांच्या नातेवाईकांकडून आवश्यक ती कागदपत्रे सादर केली जातील, त्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना याचा लाभ दिला जाईल.

८१ कर्मचाऱ्यांचे दावे रखडले

दरम्यान, २५९ पैकी ३७ कामगारांचे मृत्यूबाबतचे अहवाल प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उर्वरीत २२२ पैकी आजवर ११९ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात आल्याने आजही ८१ कर्मचाऱ्यांचे दावे कागदपत्रांची किंवा नातेवाईकांकडून हरकती घेतल्यामुळे रखडले गेले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये महापालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी कोविड बाधित होत असून १७ डिसेंबरपासून आजमितीस सुमारे २२० कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याची माहिती मिळत आहे. बुधवारपर्यंत हा आकडा १७२ पर्यंत होता, तर गुरुवारपर्यंत हा आकडा ४७ने वाढला गेल्याने बाधित रुग्णांची संख्या तिसऱ्या लाटेमध्ये २२० पर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here