१४ वी जागतिक मसाले परिषद नवी मुंबईत होणार, व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध

भारत हा प्राचीन काळापासून मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशात अनेक दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांचे उत्पादन केले जाते. मसाले व्यवसायाला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीची संधी मिळवून देण्यासाठी दरवर्षी, जागतिक मसाले परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा, 14 वी जागतिक मसाले परिषद-वर्ल्ड स्पाईस काँग्रेस (डब्ल्यूएससी) येत्या, 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबईत आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या भारतीय मसाले बोर्डाचे सचिव डी. सत्येन यांनी दिली.

( हेही वाचा : बेस्टचा डिजिटल प्रवास! लवकरच ‘या’ मार्गांवर धावणार नव्या प्रिमियम बस )

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सत्येन यांनी दिली. या कार्यक्रमात मसाले उत्पादन क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा आणि मसाल्यांची सर्वाधिक निर्यात करणार्‍या संस्थांचा सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या परिषदेची संकल्पना, ” व्हीजन-2030 : स्पाईसेस (सस्टेनेबिलिटी, प्रॉडक्टिव्हिटी, इन्नोव्हेशन, कोलॅबरेशन, एक्सेलन्स ॲन्ड सेफ्टी)” म्हणजेच मसाले व्यवसाय: शाश्वतता, उत्पादकता, नवोन्मेष, सहकारी, उत्कृष्टता आणि सुरक्षितता अशी आहे, असं ते म्हणाले.

मसाले निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर

यंदाच्या परिषदेसाठी, महाराष्ट्राची यजमान राज्य म्हणून निवड करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “महाराष्ट्र देशातील सर्वाधिक मसाले उत्पादक आहेत. विशेषतः राज्यात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. वायगांव हळदीसह हळदीचे दोन उत्तम वाण, मिरची आणि इतर जीआय टॅग असलेल्या मसाल्यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. त्याशिवाय कोकण किनारपट्टीच्या प्रदेशातही जीआय टॅग असलेल्या कोकमासह विविध मसाल्यांचे उत्पादन होते. देशात मसाल्यांची निर्यात करणाऱ्या राज्यात, महाराष्ट्र आघाडीवर आहे”.

कोविड महामारीच्या मंदीनंतर आयोजित होणारी ही परिषद, मसाले उद्योगांना विशेष उभारी देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितलं. मसाल्यांच्या बाजारपेठेची सद्यस्थिती आणि असलेली आव्हाने, यातून मार्ग काढण्यासाठी ही परिषद एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असे सत्येन म्हणाले. या कार्यक्रमात जी20 देशात मसाल्यांच्या व्यापाराच्या प्रसारासाठी विशेष व्यावसायिक सत्रेही आयोजित केली जाणार आहेत. कोविड काळात अनेक मसाल्यांचे औषधी गुणधर्म आणि रोगप्रतिकारक शक्तीबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे, भारतीय मसाल्यांची विशेषत: हळद, आले, मिरी आणि बियाणे वर्गातील मसाल्यांची मागणी वाढली आहे. भारतीय मसाल्यांच्या बाजारपेठेत गेल्या सलग दोन वर्षांत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल नोंदवली आहे. याच कालावधीत स्थानिक बाजारपेठे सुध्दा मसाल्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डब्ल्यूएससी 2023 मध्ये खालील व्यावसायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • इंडिया- दि स्पाईस बाऊल ऑफ ग्लोबल मार्केट
  • परस्पेक्टिव्ह्ज ऑन ॲड्रेसिंग फूड सेफ्टी ॲन्ड क्वालिटी रिक्वायरमेंट्स फॉर स्पायसेस (नियामक अधिकार्‍यां सह चर्चासत्र/सादरीकरण )
  • स्ट्रेंग्थनिंग ग्लोबल स्पाईस ट्रेड- कंट्री प्रस्पेक्टिव्ह ॲन्ड ऑपॉर्च्युनिटीज
  • क्रॉप्स ॲन्ड मार्केट्स- फोरकास्ट ॲन्ड ट्रेन्ड्स
  • स्पाईस मार्केट आऊटलुक बाय इंटरनॅशनल स्पाईस ट्रेड असोसिएशन्स

या कार्यक्रमात खालील उपक्रमांचा सहभाग:

  • ॲवॉर्ड्स नाईट्स- सर्वोत्कृष्ट मसाला निर्यातदारांचा सन्मान
  • अनोखा भारतीय अनुभव- सांस्कृतिक आणि खाद्यपदार्थ
  • टेक टॉक सेशन्स आणि नवीन उत्पादनांची सुरुवात
  • डब्ल्यूएससीचे आयोजन स्पाईस बोर्डाकडून इंडियन स्पाईस ॲन्ड फूडस्टफ एक्स्पोर्टर्स असोसिएशन, मुंबई सारख्या भारतातील स्पाईस ट्रेड असोसिएशन्स, इंडियन पेपर ॲन्ड स्पाईस ट्रेड असोसिएशन, कोची, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, कोलकाता आणि फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स, उंझा, गुजरात यांचा समावेश आहे.
  • डब्ल्यूएससी 2023 मध्ये केवळ नोंदणीकृत प्रतिनिधींनाच सहभागी होता येईल, ज्यांना नोंदणी करायची आहे ते https://www.worldspicecongress.com/ या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करु शकतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here