BMC : महापालिकेच्या शिव योग केंद्रातून घेतला १५ हजार लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ

232
महापालिकेच्या शिव योग केंद्रातून घेतला १५ हजार लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ
महापालिकेच्या शिव योग केंद्रातून घेतला १५ हजार लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ

मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवारी २१ जून २०२३ मुंबई महानगरातील २४ वार्डातील शिव योगा केंद्रांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील सहा महिन्यात ‘फिट मुंबई’ चळवळ अंतर्गत विविध स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १३१ शिव योग केंद्र कार्यरत असून, सध्या ६१६३ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच जून २०२२ पासून ते आजपर्यंत एकूण १५ हजार ७७ लाभार्थ्यांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या संकल्पनेत शारीरिक स्वास्थासह मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यालाही महत्त्व दिले आहे. सद्यस्थितीत रोजच्या दैनंदिन कामातील धावपळ व ताणतणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार तसेच नैराश्य यासारखे जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सन २०२२ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विभाग स्तरावर मोफत शिव योगा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १३१ शिव योग केंद्र कार्यरत असून, सध्या ६१६३ लाभार्थी योग प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून यंदा योग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “मानवतेसाठी योग” ही आहे. विभाग स्तरावरील शिव योग केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग विषयी माहिती व निरोगी आयुष्याबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता सर्व विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी योग प्रशिक्षण संस्थांसोबत समन्वय साधून आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत.

(हेही वाचा – साकीनाक्यात भरदिवसा रिक्षात प्रेयसीची गळा चिरून हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न)

उत्तम शारीरिक व मानसिक स्वास्थ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये फिट इंडिया मूव्हमेंट सुरू केली आहे. कोविड महामारीच्या विळख्यातून सुटल्यानंतर भारताच्या ‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय अभियानाला अनुसरून, महानगरपालिकेने ‘फिट मुंबई’ हा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईकरांमध्ये आरोग्य आणि तंदुरूस्तीबाबत जनजागृती करणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे ही अभियानामागील महानगरपालिकेची संकल्पना आहे. या संकल्पना अंतर्गत यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी महानगरपालिका ‘फिट मुंबई’ हा उपक्रम राबविणार आहे.

असा आहे ‘फिट मुंबई’ उपक्रम

जे नागरिक चालत नाही त्यांना चालण्यासाठी, जे चालतात त्यांना धावण्यासाठी आणि धावणाऱ्यांना अधिक वेगाने धावण्यासाठी प्रोत्साहित करुन जागरूकता निर्माण करणे हे ‘फिट मुंबई’ उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच नागरिकांना फक्त धावण्याची सवय लावणे नव्हे तर नियमितपणे ३० ते ४० मिनिटे काही शारीरिक व्यायाम करण्याची सवय लावणे असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त तथा ‘फिट मुंबईचे’ प्रमुख समन्वयक विश्वास मोटे यांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये होणार हाफ मॅरेथॉन

‘फिट मुंबई’ या अभियानाचा एक भाग म्हणून डिसेंबर २०२३ मध्ये ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’ उपक्रम घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. तसेच मुंबईकरांसाठी माहिती (Information), शिक्षण (Education) आणि संवाद (Communication) उपक्रमही राबविण्यात येणार आहे. तसेच कार्यरत असलेल्या शिव योग केंद्रांच्या माध्यमातून सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान, प्राणायाम शिकविण्यात येणार आहे. याशिवाय वॉकेथॉन, प्लॉगॅथॉन, श्रमदान आदींच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आणि विविध स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.