नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा!

नेस्को कोविड सेंटरमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या 2,900 खाटांसह एकूण 4,300 रुग्णांची सोय होऊ शकेल. इथे रेमडीसीवीर औषधाचा पुरेसा साठा असून सुमारे 1,000 इंजेक्शन अधिकची उपलब्ध होत आहेत.

102

कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त (विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त (पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.

कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार!

यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली. या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन– सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे सुभाष देसाई यांनी मान्य केले व लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील, असे स्पष्ट केले.

(हेही वाचा : १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! कधी होणार परीक्षा? वाचा…)

4,300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल!

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1,500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्स ऑक्सीजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2,900 खाटांसह एकूण 4,300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल. रेमडीसीवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1,000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात यात भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. नेस्को संकुलात आतापर्यंत 1,17,000 व्यक्तींचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज 6000 व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.