MHADA च्या संक्रमण शिबिरांतून १५८ भाडेकरु थेट हक्काच्या मालकी घरात, सरकारने दिली त्यांना गोड बातमी

2429
MHADA च्या संक्रमण शिबिरांतून १५८ भाडेकरु थेट हक्काच्या मालकी घरात, सरकारने दिली त्यांना गोड बातमी

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील संगणकीय सोडतीद्वारे गाळे वाटप झालेल्या व स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना मंगळवारी राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते देकारपत्र प्रदान करण्यात आले. त्यामुळे मागील अनेक वर्षे संक्रमण शिबिरातील खुराड्या वजा घरात, आपल्या मूळ इमारतीचा पुनर्विकास होत नसल्याने खितपत पडणाऱ्या या कुटुंबाला आता स्वतःच्या हक्काच्या आणि मालकीच्या घरात जावून राहता येणार आहे. त्यातच या कुटुंबाला सरकारने गोड बातमी देत, म्हाडातर्फे या पात्र विजेत्या अर्जदारांकडून प्रत्येकी आकारण्यात येणारे ७०,५०० रुपये ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ करण्यात आले आहे. (MHADA)

मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी व ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी मंडळातर्फे पहिल्यांदा २८ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय सोडत म्हाडा मुख्यालयात काढण्यात आली. या सोडतीसाठी ४४४ सदनिका उपलब्ध होत्या. मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू तथा रहिवाशी यांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सदनिकांचे वितरण संगणकीय सोडतीद्वारे करण्यात आले. मात्र, या सोडतीतील विजेत्या अर्जदारांच्या कागदपत्रांची फेरपडताळणीची मागणी करण्यात आली. या मागणीनुसार, म्हाडातर्फे फेरपडताळणी करण्यात येऊन २६५ पैकी २१२ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यापैकी स्वीकृती कळविलेल्या १५८ पात्र अर्जदारांना मंगळवारी देकारपत्र देण्यात आले. उर्वरित ५३ अर्जदारांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित ५४ अर्जदारांनी स्वीकृती पत्र देण्याचे आवाहनही म्हाडाच्यावतीने करण्यात आले आहे. (MHADA)

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी बोलतांना सावे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकारात्मकतेमुळे हा ऐतिहासिक व धाडसी निर्णय आम्हाला घेता आला. या ऐतिहासिक फेरबदलामुळे बृहतसूचीवरील सदनिका वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान झाली असून सदनिका वितरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आली आहे. तसेच भाडेकरू तथा रहिवासी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. वर्षानुवर्षे संक्रमण गाळ्यात राहणार्‍या भाडेकरू तथा रहिवासी यांना मुंबईच्या हृदयस्थानी आपले हक्काचे घर मिळाले असून यात समाधान असल्याचे सावे म्हणाले. (MHADA)

(हेही वाचा – ज्याला स्वत:ची जात माहीत नाही, ते जातीय जनगणनेची मागणी करतायेत; खासदार Anurag Thakur यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)

म्हाडा मुंबई मंडळाची लवकरच २ हजार घरांची लॉटरी

‘म्हाडा’ने गेल्या वर्षभरात पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोंकण मंडळातर्फे संगणकीय सोडती काढून सुमारे वीस हजार सदनिका सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई मंडळाची २००० सदनिकांची संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येईल, असेही सावे यांनी सांगितले. प्रत्येकाला घर मिळावे हा शासनाचा हेतु आहे. त्यादृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), धनगर घरकुल योजना याद्वारे शासन घरे उपलब्ध करून देत आहे, असे सावे यांनी सांगितले. (MHADA)

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या निर्देशानुसार, मार्गदर्शनाखाली जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू तथा रहिवाशी यांना बृहतसूचीवरून सदनिका वितरण करण्यासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली,असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भातील परिपत्रक २२ डिसेंबर, २०२३ रोजी जारी करण्यात आले. मास्टर लिस्ट भाडेकरू तथा रहिवाशी यांना सदनिका वितरणाच्या धोरणाचा भाग म्हणून यापूर्वीचे प्राधिकरणाचे ठराव, परिपत्रके, आदेश रद्द, अधिक्रमित, सुधारित करून त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार निवासी गाळा वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून निवासी गाळ्यांचे वितरण संगणकीय प्रणालीने करण्याचा निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जात असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. (MHADA)

अर्जदाराने देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर देकारपत्रातील नमूद अटी व शर्तींची पूर्तता करून ताबा घेणे बंधनकारक असून तसे न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होणार असून मास्टर लिस्टवरील हक्क संपुष्टात येणार आहे. यावेळी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी अनिल वानखडे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे, उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे आदी उपस्थित होते. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.