- सचिन धानजी
मुंबईतील (Mumbai) मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह मिठी नदीमधील गाळाची सफाई काढण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निविदा निमंत्रित करून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत आहे. मात्र, या व्यतिरिक्त रस्त्यालगतच्या पेटीका नाले आणि मॅनहोल्समधील खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सफाई काढण्यात येत असून यातून काढण्यात येणारा गाळ हा रस्त्यालगत काढून ठेवला जातो. त्यामुळे या पेटीका नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेवून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठीच तब्बल १६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईतील (Mumbai) रस्त्याच्या कडेला असलेले छोटे नाले, झोपडपट्टीतील छोटे नाले हे महापालिका कामगार तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानातील स्वयंसेवी संस्थाचे सदस्य आणि महाबली यंत्राचा वापर करून साफ करतात. हा काढलेला गाळ रस्त्यालगतच काढून ठेवला जातो. या काढलेल्या गाळामुळे ब-याच वेळी रस्यावरील रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो आणि परिणामी तसेच परिसरात अस्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशाप्रकारे जमा केलेला गाळ गोळा करुन, वाहून नेऊन त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमधील हा गाळ वाहून नेण्यासाठी वाहने आणि यंत्रसामुग्री भाड्याने घेण्यात येत आहे.
महापालिकेच्या विविध विभागामध्ये रस्त्याच्या कडेचे छोटे नाले, झोपडपट्टीतील छोटे नाले, रस्त्याकडेच्या छोटया नाल्यातून काढून जमा केलेला गाळ मुंबई (Mumbai) शहराबाहेर घेऊन जाऊन खासगी जागेवर विल्हेवाट लावण्यासाठी सात परिमंडळांमध्ये स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये उणे दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न झाला असून या कामांमध्ये विविध करांसह तब्बल १६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या तसेच छोट्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असून या कंपन्यांना आवश्यक त्या परवानगी आणि पर्यावरण विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु रस्त्यालगतच्या नाल्यांमधील काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित कंपनीला केवळ भूखंड मालकाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे संबंधित कंपनीने ज्या भूखंड मालकीची परवानगी आणली असेल त्या भूखंडावर ते या गाळाची विल्हेवाट लावू शकतात,अशीही माहिती मिळत आहे.
गाळ गोळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नेमलेले कंत्राटदार आणि खर्च
- परिमंडळ १ व २ :
- कंत्राटदार कंपनी: साहिल एंटरप्रायझेस (- १५.१५ टक्के), रक्कम : ८७.०७ लाख रुपये
- परिमंडळ ३
- कंत्राटदार कंपनी: मुकेश कंस्टक्शन कंपनी (- २५. २०टक्के), रक्कम : ३.०९ कोटी रुपये
- परिमंडळ ४
- कंत्राटदार कंपनी: एम बी ब्रदर्स (- १२. २० टक्के), रक्कम : ३.८४ कोटी रुपये रुपये
- परिमडळ ६
- कंत्राटदार कंपनी: कल्पेश कॉर्पोरेशन (- १६.२० टक्के), रक्कम : ३.०० कोटी रुपये
- परिमंडळ ७
- कंत्राटदार कंपनी: साहिल एंटरप्रायझेस (- १५.१५ टक्के), रक्कम : २.७७ कोटी रुपये