औरंगाबादेत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

142

मित्रांसोबत पोहण्यास गेलेला १६ वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना रविवारी दौलताबाद किल्ला परिसरातील धबधबा नदी पात्रात घडली. शाकीब शेख फैयाज असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत दौलताबाद पोलिसांनी सांगितले की, शाकीब हा दौलताबाद परिसरातील रतन लहरे यांच्या शेताजवळ असलेल्या किल्ला परिसरातील धबधबा नदी पात्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असलेल्या ठिकाणी पात्र असल्याने मुले जिथे पोहत होती तिथे झाडांचे जाळे होते, दरम्यान पोहता पोहता शाकीब हा पात्रातील गाळात रुतल्याने पाण्यातून वरती आलाच नाही. त्यामुळे सोबतचे मित्र घाबरले आणि तात्काळ ही माहिती नागरिकांना दिली. नागरिकांनी धाव घेत शाकीबचा शोध घेत त्याला बेशुद्धावस्थेत वर काढून तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाकीब याला तपासून चार वाजेदरम्यान मृत घोषित केले. मुलगा पाण्यात बुडून मृत झाल्याची माहिती कळताच शाकीबच्या वडिलांना धक्का बसला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्यावरही दौलताबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत शाकीबचे वडील किल्ला परिसरात पुस्तके विक्री करून उदरनिर्वाह करतात. तर आई मजुरी करते. मृत शाकीबला दोन भाऊ, एक बहिण असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही घटना समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी दौलताबाद ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दगडू तडवी हे करत आहेत.

(हेही वाचा – Gujarat Earthquake: गुजरातमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.