महानगरपालिकेच्या ६ रुग्णालयांतील १६८ कोविड रुग्णांना अन्यत्र हलवले!

रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. प्राणवायू उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे.

114
कोविड बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांचे प्राणवायू उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालय अथवा कोविड केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले!

दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व २४ प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त ह्यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वय अधिकारी २४x७ या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत. ह्यामुळे प्राणवायू पुरवठा बाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही प्राणवायू पुरवठा संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, ह्याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने ह्यातून घेतली आहे.

कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू असलेल्या रुग्णशय्या उपलब्ध

मुंबई व महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोना संसर्ग बाधितांना वैद्यकीय उपचार देताना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन पुरविण्याची गरज स्वाभाविकच वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू असलेल्या रुग्णशय्या उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन वितरण करताना शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. अशा स्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जिथे प्राणवायूची पुरेशी व्यवस्था आहे अशा सुरक्षित ठिकाणी संसर्ग बाधितांना स्थलांतरित करण्यात येत आहे, जेणेकरून कोणतीही अडचण उद्भवू नये.

प्रशासन झाले सक्रिय!

ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेच्या वांद्रे स्थित भाभा रुग्णालय, कुर्ला स्थिती भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय ह्या सहा रुग्णालयातून मिळून १६८ रुग्णांना इतर रुग्णालये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ह्यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तसेच सक्रियपणे यंत्रणेला मार्गदर्शन करत आहेत. रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. प्राणवायू उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे .
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.