रॅपिड आरटीपीसीआर झाली स्वस्त! जाणून घ्या दर…

125

कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी १ हजार ९७५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे.

दर झाले निश्चित

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, पारंपरिक आरटीपीसीआर चाचणी पेक्षा रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे निदान अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात मिळते. या रॅपिड चाचण्या विमानतळ, तातडीचा रेल्वे प्रवास किंवा इतर वैद्यकीय आपत्ती दरम्यान करण्यात येतात. या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे शुल्क जास्त असते. मात्र आता तपासणीसाठी आवश्यक रिएजंटस, व्हिटीएम किट्स, पीपीई किट आणि अरेंज एक्स्ट्रैक्शन किट्स माफक दरात उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबी लक्षात घेऊन दर निश्चितीसाठी नियुक्त समितीने अहवाल सादर केला. त्यानुसार राज्यातील कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळेत रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी १ हजार ९७५ रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. अॅबॉट आयडी किंवा थर्मो फिशर अॅक्यूला (Abbot ID/ Thermo fisher Accula) या दोन्ही चाचणी पद्धतीसाठी हे दर असतील. मात्र टाटा जीन फास्ट किंवा टाटा एमडीएफएक्स (Tata MD3 Gene Fast / Tata MDFX) चाचणी पद्धतीसाठी केवळ ९७५ रुपये असतील. घरी जाऊन नमुने गोळा केल्यास प्रयोग शाळांना दोनशे रुपये अतिरिक्त दर आकारण्याची मुभा असेल.

( हेही वाचा : कोविड मृतांचा आकडा तिसऱ्यांदा शून्यावर )

जास्त दर आकारता येणार नाही

सर्वसाधारण आरटीपीसीआर चाचणीसाठीचे दर ६ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णय नुसार निश्चित करण्यात आले आहेत. ते दर पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असेही टोपे यांनी सांगितले. सहा डिसेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णय नुसार कोविड आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.