१९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी

96
१९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी
१९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी

कोकण रेल्वेचा (Konkan Railway) प्रवास हा अत्यंत निसर्गरम्य प्रवास आहे. याच कोकण रेल्वेचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे. एवढ्या वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर बोटांवर मोजण्याइतक्याच स्थानकांचा वेगाने विकास झाला असून बहुतांश स्थानके भकास पडल्याचे दिसून येत आहे. वर्ष १९९० मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापन झाल्यानंतर करारानुसार पुढील १५ वर्षांत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक होते. मात्र गेल्या १५ वर्षांपासून कोकण रेल्वे विलीनीकरणापासून अलिप्त राहिली आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण)

केंद्रीय अर्थसंकल्पात (Indian Railways) स्थान मिळण्याच्या दृष्टीने हे विलिनीकरण अत्यावश्यक आहे. ते झाल्यास सर्व स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाट, फलाटांवरील शेड व पूल, संपूर्ण मार्गाचे दुहेरी/तिहेरी/चौपदरीकरण, कोचिंग डेपो, लोकोशेड, टर्मिनस, पिटलाईन यांसारख्या पायाभूत सुविधा मिळण्यासाठी वेगळा पाठपुरावा व संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेला २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असताना यापैकी केवळ १५०० कोटी एवढी तुटपुंजी रक्कम कोकण रेल्वेला मिळाल्याने या सर्वी सुविधा प्रवाशांना कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे ‘बांधा-वापरा- हस्तांतरित करा’ तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्यातील ‘बांधा’ टप्पा १९९८ ला पूर्ण झाला. तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा सुरू आहे. या उभारणीत भारतीय रेल्वे ५१ टक्के, महाराष्ट्र राज्य शासन २२ टक्के, कर्नाटक राज्य शासन १५ टक्के, गोवा राज्य शासन ६ टक्के आणि केरळ राज्य शासन ६ टक्के असा आर्थिक सहभाग आहे. दुहेरीकरण, तसेच स्वतंत्र मालवाहतूक मार्ग यासाठी आर्थिक तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व कोकणवासीय आता ‘हस्तांतरित करा’ या टप्प्याची वाट पाहत आहेत.

रेल्वे स्थानकांत मूलभूत सुविधांचा अभाव

कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर कोलाड ते मडुरे अशी एकूण ३७ स्थानके महाराष्ट्राच्या हद्दीत येतात. यामध्ये कणकवली, रत्नागिरी, सावंतवाडी या बोटांवर मोजण्याइतक्याच स्थानकांचा विकास झपाट्याने होताना दिसून येत आहे. या स्थानकांत एस्केलेटर, लिफ्टसारख्या सुविधा आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला इंदापूर, गोरेगाव रोड, सापे-वामणे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, सौंदळ, खारेपाटण रोड येथे पुरेशा उंचीचे फलाटदेखील नाहीत. वैभववाडी स्थानकात पादचारी पूल नाही. मूलभूत सुविधा नसल्यामुळे चढ-उतार करताना प्रवाशांना त्रास होतो, पडून इजा होते. याउलट भारतीय रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या मध्य रेल्वेच्या कळवा, मुंब्रा स्थानकात कोणत्याही जलद गाडीला थांबा नसूनही जलद मार्गावर फलाट ३ व ४ बांधून तयार आहेत. कर्जत-पनवेल मार्गावरील चौक स्थानकात एकही गाडी थांबत नसूनही दोन फलाट व पूल उभे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.