जाणार जाणार म्हणताना पावसाची अधूनमधून हजेरी लावणे सुरुच आहे. पाऊस जाऊन आता थंडी सुरू झाली, तरीदेखील हवामान खाते आजही मुसळधार पावसाच्या शक्यतेचे इशारे देत आहे, त्यामुळे पाऊस नक्की कधी जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रासह देशात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे किंबहुना अधिकृतपणे त्याचे प्रस्थान केलेले आहे. असे असतानाही हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे.
(हेही वाचा : …म्हणून संदीप खरेंनी ‘इर्शाद’चा गाशा गुंडाळला!)
नोव्हेंबरमध्ये चक्क ‘येलो अलर्ट’
सोमवारी 1 नोव्हेंबरला रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला असून या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी राज्यात रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरला ‘येलो अलर्ट’ जारी झाला आहे. त्यासोबत पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून कडून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community