दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) धुळमुक्त करण्याचा निर्धार करून संपूर्ण मैदानाचा परिसरात गवताची हिरवळ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. परंतु शिवाजी पार्कमध्ये शास्त्रोक्तपणे निर्माण करण्यात येणाऱ्या हिरवळीवरच अवजड वाहने फिरवून तसेच खड्डे खणण्यात आल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांमुळे चक्क गवत विकसित केलेल्या जागांवर खड्डे निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
शिवाजी पार्क मैदानातून सतत उडणाऱ्या धुळींमुळे आसपासचे नागरिक त्रस्त असल्याने त्यांचा हा त्रास लक्षात घेता महापालिकेच्या वतीने या मैदानभर परिसरात गवताचा गालिचा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. हे गवत चांगल्याप्रकारे टिकून राहावे म्हणून या मैदान परिसरात ६ ठिकाणी विंधन विहिर बांधून त्यातील पाण्याद्वारे या गवतावर पाण्याचा मारा करून या गवताचे संवर्धन केले जाणार आहे. तब्बल ९८ हजार २४० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानात गवताचा गालिचा निर्माण करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
(हेही वाचा राज ठाकरे एकमेव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार! मनसैनिकांची बॅनरबाजी)
मैदानांवर मोठमोठे खड्डे पडले
राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा करण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध संस्थांच्यावतीने संचलन केले जाते. परंतु महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमासाठी गवताच्या गालिच्यावरच खड्डे निर्माण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मैदानाच्या उत्तर दिशेला अर्थात फुटबॉल खेळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात आली होती. गवत टिकून राहावे म्हणून या गवतावर पाण्याचा फवारा केला जातो, त्यामुळे मातीतील ओलावा कायम असतानाच यावरून वाहने गेल्याने गाडयांची चाके रुतली गेली, परिणाम मैदानांवर मोठमोठे खड्डे पडले गेले. तर नाना नानी पार्कच्या मागील बाजुसही वाहनांमुळे खड्डे निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. तर मैदानाच्या चहुबाजुला बांबूचा संरक्षक कठडा निर्माण करण्यात आला होता. त्यासाठी मैदानात खड्डे खणण्यात आले होते. त्यामुळे बांबू काढल्यानंतर त्याठिकाणी भलेमोठे खड्डे निर्माण झाले असून हे खड्डे योग्यप्रकारे न बुजवल्यास खेळाडुंचे पाय त्यात अडकून त्यांना इजा होवू शकते, असे येथील खेळाडुंचे म्हणणे आहे. यापूर्वी या मैदानात गवताचा गालिचा निर्माण केला जात नव्हता, त्यावेळी मैदानावर वाहनांमुळे खड्डे पडू नये याची विशेष काळजी घेतली जायची. परंतु ती काळजी महापालिकेचे अधिकारी आता का घेत नाही असा सवाल येथील रहिवाशांच्यावतीने केला जात आहे.