२ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी केला मोफत एसटी प्रवास

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २६ ऑगस्ट २०२२ रोजी केली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ ८७ दिवसांत राज्यभरातील २ कोटी ८ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

( हेही वाचा : FIFA वर्ल्डकप २०२२ : जगभरात फुटबॉल फिव्हर; विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!)

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर २६ ऑगस्ट पासून ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत एसटी प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून, या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

दिवसाला २ लाख ३९ हजार जणांनी घेतला लाभ

या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राज्यभरातून २ कोटी ८ लाख ६५ हजारांहून अधिक म्हणजे दररोज सरासरी २ लाख ३९ हजार ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here