भांडुपच्या फुले प्रसुतीगृहात २० खाटांचा एनआयसीयू कक्ष सुरू होणार!

२० खाटांचा हा एनआयसीयू विभाग सुरू करण्यासाठी ८ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एका वर्षाकरता या संस्थेने २ कोटी ७३ लाख ७५ हजार रुपयांचा दर निश्चित केला.

82

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहांमध्ये आता खासगी संस्थेच्या माध्यमातून २० खाटांचे नवजात शिशू अतिदक्षता विभाग(एनआयसीयू) सुरू करण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून अशाप्रकारे एनआयसीयूंची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय असून, आजमितीस महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये १७८ आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ५६ अशाप्रकारे केवळ २३४ खाटांची सुविधा आहे. त्यामुळे प्रसुतीगृहात जन्मलेल्या नवजात बालकांना दाखल करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भांडुपमधील या प्रसुतीगृहातील नवजात बालकांना आता यासाठी बाहेर हलवण्याची वेळ येणार नाही.

एका वर्षाकरता २ कोटी ७३ लाख रुपये खर्च

महापालिकेच्या २८ प्रसुतीगृहांमध्ये दरवर्षी १५ हजार प्रसुती होतात आणि त्यापैकी १५ टक्के प्रसुती झालेल्या महिलांच्या बालकांना एनआयसीयूत दाखल करण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे महापालिकेच्या प्रसुतीगृहांत जन्मलेल्या नवजात बालकांना एनआयसीयूंची सुविधा उपलब्ध करुन देण्याकरता, प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह येथे अशाप्रकारची सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये इंडियन पेडियाट्रीक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्यावतीने डॉक्टर व नर्ससह कर्मचाऱ्यांची सेवा पुरवली जाईल. या संस्थेची एकूण दहा वर्षांकरता नेमणूक करण्यात येणार आहे. दर तीन वर्षांनी एनआयसीयूचे नुतनीकरण केले जाणार आहे. २० खाटांचा हा एनआयसीयू विभाग सुरू करण्यासाठी ८ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एका वर्षाकरता या संस्थेने २ कोटी ७३ लाख ७५ हजार रुपयांचा दर निश्चित केला. त्यानुसार तीन वर्षांसाठी सव्वा आठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे प्रतिदिन प्रति खाटेकरता या संस्थेला महापालिका ३ हजार ७५० रुपये मोजणार आहे.

(हेही वाचाः नवीन कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी व्यवस्था करण्याचा विचार)

भविष्यात अधिक गरज भासणार

मुंबईतील प्रसुतीगृहांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये एनआयसीयूंची संख्या कमी असल्याने, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख तसेच आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल या मागील काही वर्षांपासून प्रशासनाला खडबडून जागे करत आहेत. आता प्रशासन जागे होत त्यांनी भांडुपच्या या प्रसुतीगृहात खासगी संस्थेकडून ही सेवा घेण्याचा निर्णय घेतला. कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये छोट्या मुलांनाच अधिक धोका असल्याने, कोविड सेंटरमध्ये एनआयसीयूंची संख्या वाढवण्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे भविष्यात ही सुविधा अधिक प्रमाणात वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.