मालवणी राडा प्रकरणी २० जणांना अटक; नक्की काय घडले?

83

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी, मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला होता. यावेळी गाड्यांची जाळपोळ, दगडफेक झाली होती. त्यामुळे राडा पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, शिवाय हवेत गोळीबार देखील करावा लागला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील मालवणी येथे दोन गटात राडा झाला. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गडात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. आता याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमके काय घडले? 

गुरुवारी रात्री मालाडमधील मालवणी परिसरात गेट नंबर पाच येथून रामनवमीनिमित्ताने शोभायात्रा जात होती. यादरम्यान दोन गटात वाद झाला आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या घटनेबाबात पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल म्हणाले की, गुरुवारी मालवणीमध्ये रामनवमी मिरवणुकीवेळी काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. ड्रोन आणि इतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तणाव निर्माण करणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात आहे आणि अटकेची कारवाई केली जात आहे. २०० ते ३०० लोकांवर आम्ही गुन्हा दाखल केला. २० हून अधिक लोकांना आम्ही ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. आणखी काही लोकांना आम्ही अटक करणार आहोत. या प्रकरणात बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे लोकं या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत.

(हेही वाचा – Indore Temple Accident: इंदूर दुर्घटनेतील मृत्यूची संख्या ३५वर, १८ जण जखमी)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.