गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील गोरेगाव रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रस्तावित ६ पदरी उड्डाण पूल, व मुलुंड, खिंडीपाडा येथील उन्नत मार्ग तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाण पूलाचे काम हे ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु काम सुरु होऊन १७ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही आजवर केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. या कामाकरिता महानगरपालिकेने १३.५० कोटी एवढी रक्कम संबंधित कंत्राटदाराला दिलेली आहे. परंतु यासाठी नेमलेल्या एस पी सिंगला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधलेल्या बिहारमधील पुलाची दुघर्टना झाल्याने गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामाची दक्षता विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्यासह दक्षता विभागाला पाठवलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. त्यात ते असे म्हणतात की, रत्नागिरी हटिल चौक, गोरेगाव येथे प्रस्तावित ६ पदरी उड्डाण पूल, १) मुलुंड, खिंडीपाडा येथे प्रस्तावित उच्च स्तरीय यज्ञीय उन्नत मार्ग आणि २) डॉ. हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाण पूलाच्या कामांचे एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला ५८४.२७ कोटी एवढ्या रकमेचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीकडून बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब रविवार ४ जून २०२३ रोजी कोसळण्याची घटना पडली आहे.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेक नागडे होणार – फडणवीस)
कॅगच्या परिरक्षण अहवालानुसार या कंपनीला चार पुलांच्या कामांचे ५८४.२७ कोटी इतक्या रकमेचे कंत्राट दिले आहे. या कामांचे कार्यादेश १४ जानेवारी २०२२ रोजी देण्यात आली होते आणि हे काम ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याची अट होती. परंतु हे काम सुरु होऊन १७ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. परंतु , या कामाकरिता महानगरपालिकेने १३.५० कोटी एवढी रक्कम संबंधित कंत्राटदाराला दिलेली आहे. बिहार राज्यातील घडलेल्या घटनेवरून या कंपनीच्या कामाचा दर्जा लक्षात घेता या कंपनीच्या कामाचे स्वरुप निकृष्ठ दर्जाचे असल्याचे दिसून येते. त्यामुळे, मुंबईमध्येही अशा घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कामे अत्यंत धिम्या गतीने होत असताना देखील महानगरपालिकेतील उच्च स्तरीय अधिकारी संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालण्याची भूमिका बजावित आहेत.
बिहार राज्यातील घडलेल्या घटनेला अनुसरुन संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा (एफआयआर) दाखल झाला आहे. त्यामुळे, बिहार राज्यातील घडलेल्या घटनेचा अहवाल मागवून संबंधित कंत्राटदाराची दक्षता विभागाकडून सखोल चौकशी करून त्यांचे यापुढील काम रद्द करावे आणि त्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे. जेणेकरुन, मुंबईमध्ये अशाप्रकारच्या घटना घडू शकणार नाहीत, असे रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कामांच्या संदर्भात एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीची दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करून त्यांचे यापुढील काम रद्द करण्यात यावे. तसेच, सदर कंत्राटदारावर दंडात्मक कारवई करण्यात यावी आणि त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community