‘स्मार्ट व बोलकी अंगणवाडी’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातल्या 200 अंगणवांडीचे रूपडं पालटणार असून, मुलांना विविध विषयांची सहज ओळख व शिक्षणाप्रती गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. स्मार्ट व बोलकी अंगणवाडी व बिल्डिंग अॅज लर्निंग एड (बाला BALA) या उपक्रमातंर्गत नांदगावपेठ व माऊली जहांगीर येथे ‘बाला’ अंगणवाडीचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
( हेही वाचा : सिंधुदुर्गातील महाविद्यालये पुन्हा गजबजणार! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश )
वैशिष्ट्यपूर्ण रचना
या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. सृष्टीजीवन, अंकलिपी, अक्षरओळख करून देण्यासाठी भिंतीवर आकर्षक चित्रांसह उपयुक्त वनस्पती, आरोग्यदायी भाज्या, पोषक आहाराचे महत्व पटवून देणारे ‘अक्षयपात्र’, छोटे उद्यान, मुलांना सुलभ हालचालींसाठी कक्ष, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अंगणवाडीतील भिंतींचा मुलांना उपयुक्त माहितीसाठी अधिकाधिक कल्पक पद्धतीने वापर होणार आहे.
अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार
या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यात 200 अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community