मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये ५ हजार ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग-इन्सिनेरेटर मशीन’ बसविण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुरुवातीला २०० अशाप्रकारच्या मशीन्स बसण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व देखभालीचा आढावा घेतल्यांनतर उर्वरीत ४८०० मशीन्सची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. या मशीन्सच्या खरेदीबाबत विविध राजकीय नेत्यांकडून आरोप झाल्यांनतर महापालिकेने प्रारंभी केवळ २०० मशीन्स बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार विविध प्रसाधन गृहांमध्ये या मशीन्स बसवण्यात आल्या आहेत.
मुंबईत आजमितीला महानगरपालिकेची ३ हजार २५४ , ‘म्हाडा’ची ३ हजार ६५९ तसेच ‘ पैसे द्या व वापरा’ तत्वावरील ७७२ आणि इतर ६०१ अशी एकूण ८ हजार २८६ सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी झोपडपट्टया आणि तत्सम वस्ती परिसरातील प्रसाधनगृहात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग-इन्सिनेरेटर मशीन’ बसविण्यात येत असून सद्यस्थितीत १३ प्रशासकीय विभागातील २०० प्रसाधनगृहात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग-इन्सिनेरेटर मशीन’ कार्यान्वित झाल्या आहेत. या संयंत्रांचे प्रचालन आणि त्यामध्ये नॅपकीनचा वेळोवेळी भरणा करण्याची कार्यवाही कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत विभागीय स्तरावर केले जात आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली.
मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्वच्छता योजनेच्या अनुषंगाने महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग-इन्सिनेरेटर मशीन’ बसविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. सॅनिटरी पॅड पुरवणे आणि वापरानंतर सॅनिटरी पॅडची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे ही दोन्ही कार्य या संयंत्रामधून केली जातात. पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी बहुल व तत्सम विभागांत लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या उपक्रम अंतर्गत वॉल-माउंटेड सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग मशिन्स बसविण्यात येत आहेत.
झोपडपट्ट्यांमधील गरजू महिलांना माफक दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध देणे आणि वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. नॅपकीन इन्सिनरेटरमध्ये दुहेरी दहन कक्षाची व्यवस्था आहे. एका कक्षामध्ये दहन आणि दुसऱ्या कक्षामध्ये वायुवर किमान ९५० अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे कोणतेही घातक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. महानगरपालिकेने सुरूवातीला २०० नग कॉम्बो संयंत्रे सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये बसविले आहेत. या संयंत्रांचा वापर, कार्यक्षमता आणि प्रचालनाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे.
घरगुती सॅनिटरी पॅड आणि डायपर हा वैद्यकीय कचरा मानला जातो. त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे प्रत्येक प्रशासकीय विभागात सॅनिटरी पॅड डिस्पोजल युनिट्स बसवण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या कचऱ्याची विल्हेवाट स्वतंत्रपणे लावणे गरजेचे आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचेही नुकसान टाळता येणार आहे, असेही उपायुक्त चंदा जाधव यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेच्यावतीने ५ हजार ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग-इन्सिनेरेटर मशीन बसवण्याचा निर्णय घेत निविदा प्रक्रिया राबवली होती.
(हेही वाचा – Dadar : दादर पश्चिमेला फेरीवाल्यांमुळे फुलांच्या कचऱ्याचे ढिग, केशवसुत उड्डाणपूलाखाली कचऱ्याने गाळा भरला)
यामध्ये वेंडीग आणि इन्सिनेरेटर प्रति मशिनच्या खरेदीकरता ७६ हजार ५२८ रुपये आणि एक वर्षांचा हमी कालावधी आणि त्यानंतरच्या दोन वर्षांची देखभाल आदींकरता अनुक्रमे ३८२६ रुपये आणि ४, ०१७ रुपये आदी रुपये निश्चित करून विविध करांसह एकूण ४३ कोटी ८७ लाख ३५ हजार २४ रुपयांच्या प्रस्तावांला प्रशासक स्थायी समितीने यांनी फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर भाजपचे मिहिर कोटेचा तसेच शिवसेना उबाठाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत शंका उपस्थित केल्यांनतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी २ जुलै २०२३ रोजी पत्रकार परिषद आयोजित करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळी आयुक्तांनी, महानगरपालिकेने सुरूवातीला केवळ २०० नग कॉम्बो मशीन्स शौचालयांमध्ये बसविण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. मशीन्स कार्यान्वित झाल्यानंतर मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेण्यात येईल व २०० नग कॉम्बो मशीन्सचा वापर, कार्यक्षमता व प्रचालनाचा आढावा घेवून उर्वरित ४ हजार ८०० नग मशीन्स बसविण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे आयुक्तांनी म्हटले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community