म्युकरमायकोसिसचे दिवसाला २०० रुग्ण वाढतात! राजेश टोपे यांची माहिती 

म्युकरमायकोसिसचे सध्या जेवढे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांना २ लाख एन्फोटेरेसीन-बी इंजेक्शनची गरज आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

सध्या राज्यासमोर म्युकरमायकोसिस या रोगाला रोखण्याचे आव्हान आहे. राज्यात या रोगाचे १५०० रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णांची ज्या प्रमाणात संख्या वाढते हे पाहता दिवसाला २०० नवे रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्या प्रत्येक रुग्णाला एन्फोटेरेसीन-बी हे १०० इंजेक्शन लागतात आणि त्याचा सध्या तुटवडा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२ लाख एन्फोटेरेसीन-बी इंजेक्शनची गरज! 

आतापर्यंत राज्यात ५०० म्युकरमायकोसिसचे रुग्ण बरे झाले आहेत, मात्र सध्या जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांना २ लाख एन्फोटेरेसीन-बी इंजेक्शनची गरज आहे. त्यासाठीही आम्ही कंपन्यांना संपर्क केला आहे, फक्त केंद्राने त्या कंपन्यांना राज्याला इंजेक्शन पुरवण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले. दरम्यान या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आम्ही संपर्क केला असता त्यांनी उत्पादन करून इंजेक्शनचा साठा तयार होण्यासाठी २ आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे. तेवढा काळ राज्यासाठी महत्वाचा असणार आहे. राज्याने हे इंजेक्शन बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचीही जमवाजमव करण्याची तयारी केली असून तो वर्धा आणि पालघर येथे पाठवून राज्यातच या इंजेक्शनचे उत्पादन करण्याची तयारी केली आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले. या आजाराच्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील, त्यासाठी कोणकोणत्या रुग्णालयात उपचार होतात, त्या रुग्णालयांची नावे प्रसिद्ध करणार आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले.

(हेही वाचा : घरोघरी लसीकरण करण्याची महापालिकेने तयारी करावी! उच्च न्यायालयाचे निर्देश )

कोरोनाच्या लसीसाठी ग्लोबल टेंडरला प्रतिसाद नाही! 

आतापर्यंत राज्याने २ कोटी ३१ लाख जणांचे लसीकरण केले आहे. सध्या दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यासाठी ३ लाख कोव्हीशील्ड आणि २ लाख कोव्हॅक्स इतक्या लसींची गरज आहे. राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. यात फायझर, मॉडर्ना आणि स्पुतनिक या लसींचा समावेश आहे. २४ मे पर्यंत हे टेंडर खुले असणार आहे. परंतु अजूनपर्यंत एकाही कंपनीने या टेंडरसाठी संपर्क साधला नाही, असेही मंत्री टोपे म्हणाले. कदाचित केंद्राचीही यासाठी परवानगी लागते म्हणून कंपन्या विचार करत असतील, असेही ते म्हणाले.

रुग्ण वाढीत महाराष्ट्र देशात ३४व्या क्रमांकावर! 

कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होऊ लागली आहे. दररोजच्या नवनवीन रुग्ण वाढीत महाराष्ट्र देशात ३४व्या क्रमांकावर आहे. आजमितीस राज्यात ४ लाख १९ हजार ७२७ सक्रिय रुग्ण आहेत. ९०.६९ टक्के रिकव्हरी रेट आहे. दररोज सुमारे अडीच लाख चाचण्या केल्या जात आहेत. १ जूनपर्यंत या रुग्ण संख्येवर पुढे लॉकडाऊन वाढवायचा कि नाही, याचा निर्णय घेतला जाईल. जेंव्हा खाटा, औषधे आणि डॉक्टर कमी पडू लागतात, तेव्हा लॉकडाऊन लावला जातो, सध्याच्या घडीला राज्यात रुग्णालयांत खाटा रिकाम्या आहेत, असेही मंत्री टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here