कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा वाहनचालक; गोपनीय माहिती पाठवताना रंगेहाथ पकडले!)
मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९९ हजार १५१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे लोढा यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले की, माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ७ हजार ४९५, नाशिक विभागात ४ हजार १७५, पुणे विभागात २३ हजार ९२६, औरंगाबाद विभागात ५ हजार ८७८, अमरावती विभागात १ हजार ७२२ तर नागपूर विभागात २ हजार ४१० बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५२५ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ४५५, नाशिक विभागात १ हजार ३६२, पुणे विभागात १२ हजार ६२२, औरंगाबाद विभागात २ हजार ७३९, अमरावती विभागात ३१६ तर नागपूर विभागात ३१ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community