मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील अनेक कामगारांची पदे रिक्त असून यापैकी २११ जागांवर बहुउद्देशीय अर्थात मल्टीपर्पज कामगारांची पदे खासगी संस्थांमार्फत भरली जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार असून या संस्थेच्या माध्यमातून २११ कामगारांची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक अकुशल कामगाराला मासिक सुमारे २६ हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडीला प्रशासकांची मान्यता मिळाल्यानंतर केईएम रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या नेमणूका केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
केईएम रुग्णालयात चतुर्थ श्रेणीतील अनेक पदे रिक्त असल्याने या २११ पदांसाठी पुढील दोन वर्षांकरता अकुशल कामगारांची नेमणूक करण्यासाठी मागील नोव्हेंबर महिन्यात मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून दरपत्रिका मागवल्या होत्या.त्यामध्ये आय स्मार्ट फॅसिटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून प्रशासकांच्या मंजुरीनंतर या संस्थेच्या माध्यमातून कामगारांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. २११ कामगारांच्या नेमणूकीसाठी या संस्थेने दोन वर्षांकरता सुमारे साडे तेरा कोटी रुपयांची बोली लावल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा भिकाऱ्यांचीही पसंती वातानुकूलित लोकलला)
या संस्थेच्या माध्यमातन नेमणूक केलेल्या कामगाराला मासिक २६ हजार रुपये एवढी मानधनाची रक्कम निश्चित करण्यात आली असून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात महापालिकेच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही फायदे महापालिकेच्या माध्यमातून दिले जाणार नाही असे या निविदेतच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबतची कोणतीही जबाबदारी महापालिकेची नसेल किंबहुना भविष्यात महापालिकेत नोकरीची हमी दिली जाणार नाही असेही नमुद केले आहे. संस्थेच्या माध्यमातून नेमलेल्या कामगाराला बेसिक ११ हजार ५०० रुपये आणि विशेष भत्ता ७ हजार याप्रमाणे ही एकूण भत्यासह २६ हजार रुपयांचे मासिक मानधन निश्चित करून दिले आहे. त्यामुळे प्रशासकांच्या मंजुरीनंतर संस्थेला कार्यादेश बजावला जाईल त्यानंतर या कंत्राटी अकूशल कामगारांची संस्थेमार्फत नेमणूक करत रुग्णालयात सेवा घेतली जाईल,असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community