मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक

199
मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक
मुंबईतील २२६ इमारती अतिधोकादायक
मुंबईतील अतिधोकादायक असलेल्या सी-१ श्रेणीतील २२६ इमारती असून यांची यादीच महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. यात शहर विभागातील ३५, पूर्व उपनगरांतील ६५ तर पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींचा समावेश असून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)  आशीष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे
मुंबईतील २२६ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८चे कलम ३५४ अन्वये ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित केल्यानंतर आणि निवासस्थाने रिक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर देखील काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील आणि त्यासाठी महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

वास्तव्यास असणारी इमारत ढोबळ मानाने अतिधोकादायक झाली आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. ती खालीलप्रमाणे…

१) इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.
२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.
३) इमारतीच्या कॉलम मधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.
४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.
५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.
६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.
७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.
८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.
९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.
१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.
हेही वाचा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.